आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:595 ग्रामपंचायतींत 478 ग्रामसेवक कार्यरत; अतिरिक्त गावांचाही आहे भार, 117 ग्रामपंचायतींचा ग्रामसेवकांविना कारभार

शहादा3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नंदुरबार जिल्ह्यातील ग्रामसेवक संवर्गातील सुमारे ११७ च्या जवळपास ग्रामपंचायतींना ग्रामसेवक नाहीत. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण ५९५ ग्रामपंचायतींचा डोलारा केवळ ४७८ ग्रामसेवक सांभाळत आहेत. परिणामी, गावविकासामध्ये मुख्य भूमिका असणाऱ्या ग्रामसेवकांना एक नाही तर चक्क तीन ते चार ग्रामपंचायतींचा प्रभार सांभाळावा लागत आहे. त्यामुळे त्यांची कर्तव्य बजावण्यात मोठी दमछाक होत आहे.

गावाच्या विकासाची ब्ल्यू प्रिंट सरपंच तयार करीत असले, तरी त्याची अंमलबजावणी करण्यासाठी ग्रामसेवकांना झटावे लागत असते. यासोबतच केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना अभियान प्रस्ताव विकास योजना राबवण्यातही ग्रामसेवकांची मुख्य भूमिका असते. त्यामुळे प्रत्येक ग्रामपंचायतीला स्थायी ग्रामसेवक असणे गरजेचे आहे; परंतु एका ग्रामसेवकाला दोन किंवा तीन ग्रामपंचायतींचा डोलारा सांभाळावा लागत आहे. परिणामी ग्रामसेवक एक दिवस एका ग्रामपंचायतीला तर दुसऱ्या दिवशी दुसरी पंचायतीत कर्तव्य बजावत असतात. गाव विकासात ग्रामसेवकांची भूमिका महत्त्वाची असते; परंतु जिल्ह्यातील ५९५ ग्रामपंचायतींमध्ये केवळ ४७८ ग्रामसेवक कार्यरत आहेत.

कामे होत नाही, ग्रामस्थांचे ऐकावे लागते बोलणे
ग्रामसेवकांकडून अनेक गावांचा पदभार असल्याने कामानिमित्त कार्यालयात येणारे नागरिक ग्रामसेवक भेटतच नसल्याची ओरड करताना नेहमी दिसून येत आहे. त्यामुळे आपले दुखणे कुणाजवळ सांगावे, असा प्रश्न ग्रामसेवकांना पडत आहे. एका ग्रामसेवकाकडे तीन ते चार ग्रामपंचायतींचा पदभार सोपवण्यात आला आहे. तरीही कर्मचारी प्रामाणिक कर्तव्य बजावत आहे. शासनाच्या नियमाप्रमाणे पाठपुरावा चालू आहे. तरी कोणत्याही प्रकारची दखल घेतली जात नसल्याची खंत ग्रामसेवक व्यक्त करीत आहेत.

मागील काही वर्षांपासून भरती नाही
अनेक ग्रामसेवक सेवानिवृत्त झाले आहे. त्यामुळे रिक्त पदांची संख्या वाढत चालली आहे. त्यामुळे ग्रामसेवकांची रिक्त पदे भरण्यात यावी, अशी मागणी ग्रामसेवक संघटनेकडून अनेकदा करण्यात आली. मात्र, याकडे दुर्लक्ष होत आहे. परिणामी ग्रामसेवकांना तीन ते चार ग्रामपंचायतींचा डोलारा सांभाळावा लागत आहे. त्यामळे ग्रामसेवकांवर ताण पडतो.

बातम्या आणखी आहेत...