आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनुशेष:आरोग्य, शिक्षण विभागात ४९५ पदे रिक्त; भरतीसाठी उपमुख्यमंत्र्यांना घातले साकडे

नंदुरबारएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हा परिषदेतील आरोग्य आणि शिक्षण या महत्त्वाच्या विभागात तब्बल विविध पदाच्या ४९५ जागा रिक्त आहेत. त्यामुळे त्याचा शैक्षणिक कामकाजावर आणि थेट नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. त्यामुळे हा अनुशेष भरून काढण्यासाठी जिल्हा परिषदेच्या नूतन अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत रिक्त पदे तत्काळ भरण्यात यावी, अशी मागणी केली. त्यास त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

नंदुरबार जिल्हा हा कुपोषित बालके, बालमृत्यू, गरोदर महिला मृत्यू, सिकलसेल, बेराेजगार, आदिवासींचे स्थलांतर यासाठी नेहमीच चर्चेत असतो. कोट्यवधींचा खर्च होऊनही कुपोषण, सिकलसेल या सारख्या आरोग्याच्या प्रश्नांवर प्रशासनाला मात करता आलेली नाही. नंदुरबार जिल्ह्यातून जवळपास ३७ हजार मजूर दरवर्षी स्थलांतरित होत आहेत. स्थलांतराचा प्रश्न अजूनही सुटलेला नाही.

त्यात ग्रामीण विकासाचा कणा असलेल्या जिल्हा परिषदेत आरोग्य आणि शिक्षण विभागातील रिक्त पदांमुळे कामात अडथळा निर्माण होत आहे. यात आरोग्य विभागात १ हजार २२२ पदे मंजूर असून त्यापैकी केवळ ७८० पदे भरण्यात आली आहेत. तर तब्बल ४४२ पदे रिक्त आहेत. सर्वाधिक पदे आरोग्यसेवक व आरोग्य सेविकेच्या रिक्त असल्याने आरोग्य विभागच आजारी पडला आहे. तसेच प्राथमिक शिक्षण विभागातदेखील ५३ जागा रिक्त आहेत. यात माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ.एम.व्ही.कदम यांच्याकडे तर नाशिक विभागाचा अतिरिक्त भार सोपवण्यात आले आहेत.

तसेच प्राथमिक शिक्षण विभागाच्या अनेक जागा रिक्तच असल्याने शिक्षण विभागाला न्याय कोण देणार असा प्रश्न उपस्थित होत आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देताना आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित, खासदार डॉ. हीना गावित, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुहास नाईक, भाजपचे तालुकाध्यक्ष भरत गावित आदी उपस्थित होते.

आरोग्य विभागातील रिक्त जागा
आरोग्य अधिकारी ३, वैद्यकीय गटअधिकारी गट ५, आरोग्य सहायक पुरुष ४, आरोग्य सहायक स्त्री १, आरेाग्य सेवक १०४, आरोग्य सेविका ३००, प्रयोगशाळा तंत्रज्ञ १५, औषधनिर्माण अधिकारी १० अशा एकूण ४४२ जागा रिक्त असल्याने आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त ताण पडत आहे. नंदुरबारच्या आरेाग्य विभागाची स्थिती सुधारण्यासाठी रिक्त जागा भरणे गरजेचे आहे.

शिक्षण विभागातील रिक्त पदे : विस्तार अधिकारी २२ पदे रिक्त, केंद्र प्रमुखाची २० पदे, गट शिक्षणाधिकारी ४ पदे, पोषण आहार अधीक्षक ६ , आणि माध्यमिक १ उपशिक्षणाधिकारी पद रिक्त आहे.

बातम्या आणखी आहेत...