आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कामाचा भार:शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील 510 पदांचा कारभार 81 जणांवरच सुरू

नंदुरबार23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या वर्ग एक ते चार संवर्गातील एकूण ५१० पदे मंजूर करण्यात आली असून, त्यापैकी केवळ ८१ पदे भरण्यात आली आहेत. मात्र ४२९ जागा अजूनही रिक्तच आहेत. तसेच रुग्णालयातील नियमित एक ते तीन पदांसाठी १ हजार ७२ जागांपैकी एकही जागा भरण्यात आलेली नाही. यंदा महाविद्यालयाला तिसरे वर्ष सुरू असूनही विद्यार्थ्यांच्या वसतिगृहांच्या गंभीर प्रश्नाकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

नंदुरबार शहराला मोठ्या प्रयत्नाने तीन वर्षांपूर्वी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू झाले आहे.महाविद्यालयासाठी ५१० पदे मंजूर आहेत. मात्र ८१ पदे भरण्यात आली आहेत. तर ४२९ पदे रिक्तच आहेत. अधिष्ठाता, प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक व मुख्य प्रशासकीय अधिकाऱ्यांची ४५ पदे मंजूर असताना केवळ ६ पदे भरण्यात आली आहेत. तर ३९ पदे रिक्तच आहेत. तसेच वर्ग २ सहाय्य प्राध्यापक व प्रशासकीय अधिकारी ४७ मंजूर पदांपैकी १६ पदे भरण्यात आली आहेत. ३१ पदे रिक्त आहेत. तसेच वर्ग तीन ची ९३ पदे मंजूर आहेत. पैकी १९ पदे भरण्यात आली असून ७४ पदे रिक्त आहेत. विद्यार्थी पदे १२१ मंजूर असून १९ पदे भरण्यात आली आहेत. तर १०२ पदे रिक्त आहेत.

वाहनेही नसल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय
वैद्यकीय महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह नसल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय होणार आहे. पालकमंत्री तथा आदिवासी विकासमंत्री डाॅ. विजयकुमार गावित यांनी या प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे. इंजिनिअरिंग प्रोजेक्ट इंडिया लिमिटेड या कंपनीला इमारतीसह अन्य बांधकामाचे टेंडर देण्यात आले होते. मात्र प्रक्रिया थांबली आहे. वैद्यकीय महाविद्यालय लांब असल्याने विद्यार्थ्यांना वाहनांची सोय नाही.

जिल्हा सामान्य शासकीय रुग्णालयाच्या हस्तांरण सामंजस्य करारास मुदतवाढ देऊन नूतनीकरणाचे प्रस्ताव ८ जानेवारी २०२२ व ७ एप्रिल २०२२ अन्वये शासनास प्रस्ताव सादर केला आहे. हा प्रस्ताव शासनाकडे प्रलंबित आहे.

वर्ग तीन संवर्गांची बाह्यस्रोताने पदे भरण्यासाठी ई-निविदा मागवली असून एल-वन धारक आलेल्या पुरवठा धारकास पुरवठा आदेश देण्यासाठी व सदरील पदाच्या खर्चास शासन परिपत्रक २ फेब्रुवारी २०१३ व २ डिसेंबर २०१३ मध्ये दिलेल्या बाह्यस्रोताने पदे भरण्यासाठी खर्चाच्या टक्केवारीनुसार प्रशासकीय मान्यता मिळण्यासाठी २५ फेब्रुवारी व १ जून २२ च्या पत्रानुसार प्रस्ताव सादर केलेला आहे. हा प्रस्तावही प्रलंबित आहे.

रुग्णालयाच्या विविध उद्दिष्टांतर्गत २०२३-२४ करिता ४३ कोटी ७२ लाख ४३ हजार निधीचे अंदाज पत्रक सादर केले आहे. तर महाविद्यालयात वर्ग चार अकुशल मंजूर असलेल्या १२ पदांवर मेस्कोमार्फत सुरक्षारक्षक पुरवणीसाठी २४ फेब्रुवारी २०२२ रोजी प्रस्ताव सादर केलाय.

रिक्त जागांचा पाठपुरावा
नंदुरबार येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात तिसऱ्या बॅचचे प्रवेश सुरू झाले आहेत. रिक्त जागा भरण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. तसेच विद्यार्थ्यांना वसतिगृह नसल्याने त्यांची गैरसाेय होत आहे. त्यामुळे मुली व मुलांसाठी राहण्यासाठी शासकीय इमारत मिळवण्यासाठी प्रयत्न सूर आहेत. -डॉ. शिवाजी सुक्रे, डीन, मेडिकल कॉलेज, नंदुरबार

बातम्या आणखी आहेत...