आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करावीज महावितरण कंपनी खासगी कंपनीच्या ताब्यात देण्याच्या धाेरणाच्या निषेधार्थ जिल्ह्यातील सर्व ६६० वीज कर्मचाऱ्यांनी संप पुकारला असून राष्ट्रवादी काँग्रेसने या संपाला जाहीर पाठिंबा दिला. अधीक्षक अभियंता कार्यालयासमोर जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांनी ठिय्या मांडला. यावेळी राज्य शासनाच्या धोरणाविरोधात घोषणा देण्यात आल्या. दरम्यान जिल्ह्यात कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या खांद्यावर सध्या पदभार सोपवण्यात आला आहे.
कुठे वीजपुरवठा खंडित झाला तर कंत्राटी कर्मचारी तत्काळ वीज पुरवठा सुरळीत करत आहेत. त्यामुळे एकीकडे संप सुरू असला तरी नागरिकांच्या अडचणी सोडवण्यासाठी पर्यायी व्यवस्था सज्ज आहे. दरम्यान येथील गिरीविहारातील वीज सर्कल कार्यालय अर्थात अधीक्षक अभियंत्यांच्या कार्यालयाच्या समोर जिल्ह्यातील वीज कर्मचाऱ्यांनी ठिय्या मांडून संघर्षाची भूमिका घेतली. तसेच अदानींच्या विरोधात तसेच उर्जा मंत्र्यांच्या विरोधात जाेरदार घोषणाबाजी झाली. आली.
महापारेषण, महानिर्मिती व महावितरण या तिन्ही वीज कंपन्यांचे कामकाज चांगले असताना राज्य सरकारने खासगीकरणाचे धोरण अवलंबण्याचा निर्णय घेतला.या तिन्ही कंपन्यांमध्ये कुठल्याही पद्धतीने खासगीकरण करणे सहन केले जाणार नाही, असे स्पष्ट सांगितलेले असताना अदानी इलेक्ट्रिक कंपनीने भांडूप परिमंडळातील क्षेत्रामध्ये वितरण करण्याचा समांतर परवाना महाराष्ट्र राज्य विद्युत नियामक आयोगाकडे मागितला आहे.
यास वीज कंपन्यांतील संघटनांचा विरोध आहे. राज्य सरकारच्या धाेरणाच्या विरोधात क्रमबद्ध आंदोलन करण्याचा निर्णय या आधीच झाला असून त्यातील हा पहिला टप्पा सुरू झाला आहे. सरकार व प्रशासनाच्या धोरणामुळेच प्रचंड थकबाकी आहे. यास कामगार, अधिकारी व अभियंते जबाबदार नाहीत, असे मत वीज संघर्ष समितीने व्यक्त केले.
अन्यथा बेमुदत संप करणार
दरम्यान या तीनदिवसीय संपानंतरही धाेरण व मागण्या कायम राहिल्यास १६ जानेवारी रोजी द्वारसभा व १८ जानेवारीपासून बेमुदत संप पुकारण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य वीज कर्मचारी, अधिकारी,अभियंता संघर्ष समितीसह एकूण ३० संघटनांनी घेतला आहे. नंदुरबार व शहादा विभागात ६ सबस्टेशन, ५९ वितरण विभागात बाहेरच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांकडून ब्रेक डाऊनचे काम सुरळीत करण्याचे आश्वासन देण्यात आल्याचे अधीक्षक अभियंता ए.ए. बोरसे यांनी दैनिक ‘दिव्य मराठी’शी बोलताना सांगितले. सर्कल कार्यालयात कंट्रोल रूम तयार केली असून तेथून तक्रार निवारण करण्याची सुविधा आहे. दिवसभरात ज्या भागात वीजपुरवठा खंडित झाला असेल त्या भागात तत्काळ वीज सुरळीत केल्याचा दावा केला आहे.
खासगीकरणाचा डाव निषेधार्ह
विमान तळासह अनेक कंपन्यांचे खासगीकरण करून विशिष्ट भांडवलदारांच्या खिशात घालण्याचा केंद्र शासनाचा डाव आहे. यापुढे संघटनेत फूट पाडून संप फोडण्याचा प्रयत्न होऊ शकतो. राज्य व केंद्र शासन खासगीकरणाला अनुकूल आहे. वीज महावितरण कंपनीचे कर्मचारी ऊन-पावसामध्ये अहोरात्र काम करून वीज सुरळीत ठेवण्याचे काम करत आहेत. नागरिक, शेतकरी समस्यांना तोंड देत आहेत, अशात खासगीकरणाचा डाव हा अत्यंत निषेधार्ह आहे. -डॉ.अभिजित मोरे, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, नंदुरबार.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.