आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअश्लील व्हिडीओ कॉल करुन खंडणी उकळणाऱ्या महिलेसह पोलिस कर्मचारी व एका पत्रकाराला नंदुरबारच्या पोलिसांनी अटक केली आहे. नंदुरबारच्या एका स्थानिक महिलेने पोलिसाला हाताशी धरून म्हसावद (ता.शहादा) येथील एका नोकरदाराला आपल्या जाळयात अडकवून तब्बल नऊ लाख रूपये उकळले. त्यानंतर एका तथाकथीत पत्रकारानेही खंडणी मागण्यास सुरूवात केली. याप्रकरणी त्या नोकरदाराने पोलिसांकडे तक्रार केली. तपास करत तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात विशेष करुन शहरात व्यापारी, नोकरदार वर्ग यांच्याशी अश्लील व्हिडीओ कॉल करुन ते रेकॉर्ड केल्याचे भासवून त्यांना बदनामीची धमकी देऊन खंडणी मागण्याचे प्रकार सुरू होते. याबाबत पोलिसांनी तक्रारदाराचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र बदनामीच्या भीतीने कोणीही पुढे येत नव्हता. मात्र एका नोकरदाराला त्रास असह्य झाल्याने त्याने तक्रार केल्याने बिंग फुटले. पोलिस कर्मचारी छोटू तुमडू शिरसाठ (वय ४६), तथाकथित पत्रकार अतुल रामकृष्ण थोरात (चौधरी) (वय ५०, रा.दत्त कॉलनी, कोरीट रोड, नंदुरबार) व महिलेला पोलिसांनी अटक केली आहे. मात्र त्या महिलेचे नाव प्रसिद्धीस दिले नाही.
असे ओढले जाळ्यात : म्हसावद येथील तक्रारदार नोकदारास ९ एप्रिल रोजी मोबाईलवर एका अनोळखी महिलेने फोन केला. स्वतःची ओळख न देता ती महिला तक्रारदारास वारंवार फोन करून भेटण्यास बोलवू लागली. मात्र त्यांनी नकार दिला. त्यानंतर त्या महिलेने व्हिडीओ कॉल करून त्यादरम्यान अश्लील चाळे सुरु केले व त्याचा व्हिडीओ तयार केला.
बदनामीच्या भितीने दिले नऊ लाख रुपये
दुसऱ्या दिवशी तक्रारदारास पोलिस छोटू शिरसाठ याने फोन करुन बदनामी करण्याची भीती दाखवून मध्यस्थी करण्यास सुरुवात केली. १४ लाख रुपयांची मागणी केली. बदनामीच्या भितीने व व्हिडीओ कॉलची असलेली क्लीप नष्ट करण्याच्या अटीवर पोलिस छोटू शिरसाठ याच्या मार्फत तक्रारदाराने महिलेस ९ लाख रुपये दिले.
पुन्हा नऊ लाखांची मागणी
काही दिवसांनी एक तथाकथित पत्रकार अतुल चौधरी हाही तक्रारदारांकडून पुन्हा ९ लाख रुपयांची मागणी करु लागला. बदनामीची भीती दाखवून छोटूने खंडणी वसुलीचा प्रयत्न केला. तक्रारदार त्रस्त असल्याने जिल्हा पोलिस अधीक्षक पी.आर. पाटील यांंची भेट घेत घडलेला प्रकार सांगितला.
आत्महत्या करण्याच्या मनस्थितीत
तक्रारदार हा आत्महत्या करण्याच्या मनस्थितीत होतो. पोलिस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी तत्काळ अपर पोलीस अधीक्षक विजय पवार यांच्याशी चर्चा करुन तसेच शहादा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दीपक बुधवंत व एलसीबीचे पोलिस निरीक्षक रवींद्र कळमकर यांना कारवाईचे आदेश दिले व शहादा पोलिसांत गुन्हा नोंदवला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.