आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजिल्हा शासकीय रुग्णालयाचे महिला हॉस्पिटलच्या १५ कर्मचाऱ्यांचा करार संपल्याने तसेच चार महिन्यांपासून पगार न झाल्याने त्यांनी कामावर येणे बंद केले आहे. केसपेपर काढणाऱ्या केंद्राला त्याचा फटका बसला. करारावर काम करणारे कर्मचारी कामावर न आल्याने केसपेपर काढण्याचे काम साध्या शिपायाकडे सोपवण्यात आले. यामुळे केसपेपर काढण्यासाठी रुग्णांचे हाल झाले. कराराचा विषय हा नाशिकच्या ठेकेदार तसेच राज्य शासनाचा असल्याने स्थानिक प्रशासन पुनर्नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत.
नाशिकच्या महाराष्ट्र विकास ग्रुपने शासनाशी करार करून ठेका पद्धतीने १५ कर्मचारी हे जानेवारी २०२२ ते ३१ डिसेंबर २०२२ या करारावर दिले होते. चार महिन्यांपासून या कर्मचाऱ्यांना पगार देण्यात आलेला नाही. तसेच करार संपताच अविश्वास दर्शवत सर्व १५ कर्मचाऱ्यांनी कामावर येणे बंद केले आहे. याचा फटका रुग्णालयात बसत आहे. केसपेपर काढण्याचे काम खासगी ठेकेदाराच्या कर्मचाऱ्यांकडे होते. हा कर्मचारी दोन जानेवारीला हजर झाला नाही. साहजिकच रुग्णांना केस पेपरसाठी मनुष्यबळाची कमतरता भासली. तात्पुरत्या स्वरूपात एका शिपायाला हे काम देण्यात आले.
मात्र त्या कर्मचाऱ्याला संगणकाचे ज्ञान नसल्याने खूप हाल झाले. केसपेपरचे काम हळुवार पद्धतीने सुरू होते. त्यामुळे खूप रांगा लागल्या होत्या. प्रशासकीय कार्यालयाशी ‘दिव्य मराठी’ने संपर्क साधला असता ते म्हणाले, या सर्व कर्मचाऱ्यांचे मानधन दिले जाईल. काही तांत्रिक अडचणी असतात. खासगी ठेकेदाराने मानधन द्यायला हवे होते. दुसरीकडे ठेकेदारच बदलण्याची चर्चा असून, या घोळामुळे १५ कर्मचाऱ्यांचा नवीन करार तसेच जुने मानधन यात वाद निर्माण झाला आहे.
जिल्हा शल्यचिकित्सकांनी टाळले बोलणे
कर्मचाऱ्यांचा करार, त्यांचे मानधन हा विषय राज्यशासनाचा आहे, असे सांगत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.चारूदत्त शिंदे यांनी बोलणे टाळले. तर जिल्हा शासकीय रुग्णालयात रक्त तपासणी, किडनी तपासणी सुरू करण्यात आली असून, यापूर्वी या तपासण्या बाहेरून करण्यात येत होत्या. आता जिल्हा शासकीय रुग्णालयातच सुविधा झाल्याने रुग्णांचे तत्काळ रिपोर्ट हातात मिळून डॉक्टरांना शस्त्रक्रियेसाठी निर्णय सोपे होणार आहे, अशी माहिती शिंदे यांनी दिली.
औषध साठांचा होतोय टप्प्याटप्प्याने पुरवठा
दरम्यान, जिल्हा रुग्णालयातील औषधांच्या तुटवड्याचे वृत्त ‘दिव्य मराठी’ने यापूर्वी प्रसिद्ध केली होती. टप्प्याटप्प्यात आवश्यक औषधांचा साठा करण्यात येत असून, पंधरा दिवसांत पूर्ण औषधी उपलब्ध होतील, असा अंदाज व्यक्त होत आहे. त्यामुळे रुग्णांची होणारी गैरसोय दूर होणार आहे, अशी माहितीही वैद्यकीय सूत्रांनी दिली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.