आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापेट्रोल व डिझेल पंप मालकांच्या संपाची अफवा पसरल्याने नंदुरबार शहरासह जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून पेट्रोलपंपावर ग्राहकांची गर्दी होत असून अनावश्यक इंधन साठा करण्यावर ग्राहक भर देत आहेत. त्यामुळे शहरातील चार ते पाच पेट्रोलपंपावरील इंधन साठा संपला आहे. आता उद्यापासून मुबलक पेट्रोल व डिझेल मिळू शकणार आहे. त्यामुळे अनावश्यक इंधन खरेदी न करण्याचे आवाहन पेट्रोल पंप चालकांनी केले आहे.
संपामुळे इंधनाची टंचाई भासणार, अशी अफवा पसरवण्यात आल्याने ग्राहकांनी चारपट इंधन खरेदी केले. त्यामुळे काही पेट्रोल पंपांवर इंधन साठा संपला तर काही पेट्रोलपंपावर अतिरिक्त गर्दी दिसून आली. यात ग्राहकांचे तर हाल झालेच; परंतु सर्वाधिक त्रास पेट्रोलपंपावर काम करणाऱ्या नोकरांना झाला. रात्री उशिरापर्यंत पेट्रोल पंप सुरूच होते.
विविध मागण्यांसाठी मनमाड डेपाेतून एक दिवस इंधन खरेदी करणार नाही, यासाठी पेट्रोल पंप चालकांनी आवाहन केले होते. त्याचा चुकीचा संदेश लोकांपर्यंत गेला. तसेच पेट्रोल व डिझेल मिळणार नाही, अशी अफवा पसरवण्यात आली. त्यामुळे स्वाभाविकपणे दोन दिवसांपासून रात्री उशिरापर्यंत चार पटीने इंधन भरण्याकडे ग्राहकांचा कल दिसून आला. या सर्व गैरसमजुतीमुळे ग्राहकांनी अनावश्यक आगाऊ इंधन भरून घेतले. तर रात्री दीड तास अधिक पेट्रोल पंप सुरू ठेवावे लागले. यामुळे पेट्रोलपंपावरील कर्मचाऱ्यांचे खूप हाल झाले. एक मिनिटही त्यांना बसता आले नाही. तसेच जेवण करण्यासही सवड मिळाली नाही. सुभाष चौकात तर एकाच वेळी दोन दिवसांपासून ५० हून अधिक वाहने पेट्रोलपंपावर इंधन भरण्यासाठी उभी असल्याचे दिसून आले.
दरम्यान, बुधवारी सकाळी ८ वाजता मनमाडवरून ७ हजार लिटर पेट्रोल भरून टँकर निघाला. तो नंदुरबारला दुपारी १ वाजून ३० मिनिटांनी दाखल झाला. सुभाष चौकात टँकर खाली करण्यात आला.
पेट्रोल दरात १३ रुपयांचा फरक; ग्राहकांचा कल गुजरातकडे
गुजरात व महाराष्ट्राच्या पेट्रोल विक्री दरात साधारण १३ रूपये प्रति लिटर फरक असल्याने गुजरात व महाराष्ट्राच्या सीमेवर असलेल्या तळोदा, प्रकाशा, नवापूर या भागातील पेट्रोल पंपांवर विक्रीचा परिणाम झाला आहे. महाराष्ट्राऐवजी गुजरातमधून पेट्रोल खरेदीवर ग्राहक भर देतात. त्यामुळे महाराष्ट्रात पेट्रोलचे दर कमी करावेत, अशीही मागणी होत आहे.
तुटवडा नसल्याने अतिरिक्त पेट्रोल साठवू नका; सध्या टंचाईचे कारण नाही
डिझेलचे दर कमी केल्याने कंपन्यांना डिझेल विक्री करणे परवडत नसल्याने कंपनीने डिझेल पुरवठ्याचा कोटा ठरवून दिला आहे. त्यामुळे भविष्यात डिझेलची टंचाई भासू शकते. परंतु पेट्रोल विक्रीत सध्या तरी टंचाई नाही. त्यामुळे ग्राहकांनी अतिरिक्त पेट्रोलचा साठा करू नये.
-अंकित दोशी, मालक, पेट्रोलपंप, नंदुरबार.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.