आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुर्लक्ष:देखभाल, दुरुस्तीचा करार संपल्याने विसर्जन मार्गावरील सर्वच कॅमेरे बंद; गणेशोत्सवापूर्वी सीसीटीव्ही कॅमेरे सुरु करणे आवश्यक

नंदुरबार3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरात २०१४-२०१५ या वर्षी जिल्हा वार्षिक योजनेत नावीन्यपूर्ण योजनेत सुरू करण्यात आलेल्या सीसीटीव्हीचे तीनतेरा वाजले आहेत. तर देखभाल दुरुस्तीसाठीचा करार संपल्याने दुरुस्तीच न झाल्याने सर्वच सीसीटीव्ही कॅमेरे बंद आहेत. यापूर्वी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसाठी मंजूर झालेला ९० लाखांचा निधी परत गेल्याने सीसीटीव्हीचा प्रश्न गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

शहरातील गणेश मिरवणूक मार्गावर २०१४-२०१५ या वर्षी बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेरेच मॉनिटरिंग फडके चौकातून होत होते. कोराेना काळात विसर्जन मिरवणूक साध्या पद्धतीने काढण्यात आल्याने सीसीटीव्हीची गरज पडली नाही. कोरोना काळानंतर आता पुन्हा विविध सण साजरे होत आहेत. सराफा बाजारात सोन्या चांदीचे दुकाने आहेत. या भागात अनेकदा चोरीच्या घटना घडल्या आहेत. सीसीटीव्ही कॅमेरामुळे चोर हुडकण्यास मदत होत असते. तसेच मिरवणुकीत दंगेखोर कोण हे तपासण्यात सीसीटीव्ही कॅमरे महत्त्वाचे ठरतात. गेल्या अनेक वर्षांत सीसीटीव्ही कॅमेरे दुरुस्त करण्यात आलेच नाहीत. सर्व २८ कॅमेरे बंद असून, कॅमेरे दुरुस्ती न झाल्याने पोलिसांना आरोपी शोधण्यात अडचणींचा सामोरे जावे लागत आहे. शहरातील २८ कॅमेऱ्यांचे मॉनिटरींग फडके चौकात करण्यात येत होते. आता तर सर्वच कमॅरे बंद असल्याने नव्याने सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे.

वायर तुटलेली, कार्बनचा चढला थर
नंदुरबार शहरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची वायर तुटली आहे. काही कॅमेरे पतंगांच्या दोऱ्यांमुळे खराब झाले आहेत. वायरवर कार्बन साचल्याने कॅमेरे पूर्ण बंद आहेत. एका पोलिस अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर २८ पैकी ६ कॅमेरेच सुरू असल्याची माहिती दिली. मात्र प्रत्यक्षात पडताळणी केली असता एकही कॅमेरा सुरू नसल्याची बाब समोर आली आहे.

करार संपल्याने दुरुस्तीकडे दुर्लक्ष
नंदुरबार शहरातील सीसीटीव्ही कॅमेरा देखभाल दुरुस्तीचा ठेका शहरातील पवन रघुवंशी यांना देण्यात आला होता. मात्र करार संपल्याने पुढे कोणताही करार करण्यात आला नाही. त्यामुळे त्यांनी शहरात बसवण्यात आलेल्या कॅमेऱ्यांची दुरुस्त केले नाही. त्यामुळे सीसीटीव्ही कॅमेरा दुरुस्तीच झाले नसल्याने ते धूळखात पडले आहेत. हे सर्वच कॅमेरे बंदस्थितीत आहेत.

बिघडलेले कॅमेरे दुरुस्ती करू
नंदुरबार शहरातील गणेश विसर्जन मार्गावरील बिघडलेले सीसीटीव्ही कॅमेरे दुरुस्त करण्यात येतील. तसेच समाजकंटक आणि चोरट्यांवर लक्ष ठेवण्यासाठी व्यापाऱ्यांशी संवाद साधून त्यांचे कॅमेरे सुरू राहतील यासाठी प्रयत्न करू.
पी. आर. पाटील, जिल्हा पोलिस अधीक्षक, नंदुरबार

बातम्या आणखी आहेत...