आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरोग्याचे बळकटीकरण:16 कंत्राटी डॉक्टरांची नियुक्ती; अजूनही 15 पदे रिक्त, स्त्रीरोग,भूलतज्ज्ञांनी फिरवली पाठ

नंदुरबारएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या ३१ रिक्त पदांसाठी दिवसभर झालेल्या मुलाखती दरम्यान १६ डॉक्टरांची भरती करण्यात यश मिळाले असून, स्त्रीरोगतज्ज्ञ, भूलतज्ज्ञ या पदासाठी कुणीही अर्ज न केल्याने ही पदे अद्यापही रिक्त आहेत. कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने ही पदे भरण्यात आली असून, या पदांमुळे आरोग्य यंत्रणेवरील ताण कमी होणार आहे.

नंदुरबार जिल्ह्यात आरोग्य विभागात एमबीबीएस, बीएएमएस, बालरोगतज्ज्ञ, मानसोपचारतज्ज्ञ, फिजिशियन अशा पदे रिक्त होती. सकाळी ११ वाजेपासून जिल्हा परिषदेच्या सभागृहात मुलाखतीला प्रारंभ झाला. दुपारी ३ पर्यंत मुलाखती संपल्या. पॅनेल प्रमुख म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे यांनी काम पाहिले. तर सचिव म्हणून डॉ. नारायण बावा, सदस्य जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.चारुदत्त शिंदे, अतिरिक्त शल्य चिकित्सक डॉ. के.डी. सातपुते, जिल्हा आरोग्य अधिकारी गाेविंद चौधरी, डाॅ.मनोज चौधरी, डॉ. किसन पावरा आदींनी काम पाहिले.

स्त्रीरोगसह भूलतज्ज्ञांनी ही आले नाही मुलाखतीला
नंदुरबार जिल्ह्यात कुपोषित बालकांची समस्या मोठी आहे. यासाठी ६ बालरोगतज्ज्ञांची आवश्यकता होती. प्रत्यक्षात एकच उमेदवार आला. त्यामुळे अजूनही पाच जागा रिक्तच आहेत. महिलांची प्रसूती, आजारासाठी स्त्रीरोग तज्ज्ञांची आवश्यकता असते. त्यामुळे स्त्रीरोगतज्ज्ञ तसेच भूलतज्ज्ञाच्या रिक्त जागेवर एकाही उमेदवाराने अर्ज न भरल्याने या दोन्ही जागा रिक्तच आहेत. त्याचा रुग्णांवर परिणाम होईल.

आरोग्य यंत्रणेवरील ताण कमी होणार
नंदुरबार जिल्ह्यात दुर्गम भागात तसेच ग्रामीण रुग्णालयात काम करण्यास कुणीही इच्छुक नसते. कोरोना सारख्या महामारीच्या वेळेस तात्पुरत्या स्वरूपात परिचारिकांची भरती करण्यात आली होती. दुर्गम भागात डॉक्टर उपस्थित राहत नाहीत. तसेच मुंबई, पुणे, नाशिकचे डॉक्टर नंदुरबार सारख्या आदिवासी दुर्गम पाड्यात काम करण्यास इच्छुक नसतात. वर्षानुवर्षे ही पदे रिक्त होती. मात्र आरोग्य विभागाला सुदृढ करण्यासाठी रिक्त पदे भरणे गरजेचे होते. ४३ पैकी ३१ पदे भरण्यात आल्याने आरोग्य यंत्रणेवरील ताण कमी होणार आहे.

आदिवासी रुग्णांना फायदा होणार
पूर्वी एमबीबीएस डॉक्टरच मिळत नव्हते. यावेळी मिळाले. त्यामुळे ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणेला बळकटी मिळाली आहे. नवीन भरती झालेले डॉक्टर आदिवासी भागात उत्तम सेवा देतील. त्यामुळे रुग्णांना फायदा होईल.
-रघुनाथ गावडे, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प.नंदुरबार

अधिक सुविधा रुग्णांपर्यंत पोहोचतील
शिशू तसेच वयोवृद्ध असलेल्या रुग्णांना फायदा होणार आहे. ग्रामीण भागातून जिल्हा शासकीय रुग्णालयात रेफर होण्याचे प्रमाण कमी होऊन ग्रामीण रुग्णालयातच त्यांच्यावर उपचार केले जातील. आरोग्य सुविधा रुग्णांपर्यंत पोहाेचेल.
-डॉ. चारुदत्त शिंदे, जिल्हा शल्यचिकित्सक, नंदुरबार