आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:सातपुड्यातील ‘अर्जुन’ पावराने भेदले स्पर्धा परीक्षेचे लक्ष्य; राज्य सेवा आयोगाच्या परीक्षेत वनमजुराचा मुलगा चमकला राज्यात दुसरा

तळोदा10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गावात रस्ता नाही, प्राथमिक मुलभुत सुविधा आजही पूर्णपणे उपलब्ध नाहीत अशा दुर्गम भगातील धजापानी गावातला डॉ. अर्जुन पावरा या तरुणाने खडतर परिस्थितीवर मात करीत राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळवत एसटी संवर्गातून राज्यात दुसरा येण्याचा मान मिळवला आहे.

महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाकडून २०२० मध्ये घेण्यात आलेल्या राज्यसेवा परीक्षेचा निकाल काही दिवसांपूर्वीच जाहीर करण्यात आला. या राज्यसेवा परीक्षेत तळोदा तालुक्यातील धजापाणी येथील डॉ. अर्जुन गुंजाऱ्या पावरा यांनी यश मि‌ळवले आहे. ४१२ व्या रँकवर त्यांचे नाव झळकले आहे. ते वनमजूर गुंजाऱ्या केल्ला पावरा व मानाबाई गुंजाऱ्या पावरा यांचे तिसरे पुत्र आहेत. आजही धजापाणी गावापर्यंत पोहचायला पक्का रस्ता नाही. मुलभूत सुविधा नाहीत.

वडील वनमजूर असले तरी शिक्षणाचे महत्त्व जाणून असल्याने त्यांनी अर्जून यांना पुढील शिक्षणासाठी शिरपूर येथे पाठवले. दहावी पास झाल्यानंतर शिरपूर येथूनच विज्ञान शाखेतून बारावी झाले. त्यानंतर सायन (मुंबई) येथील आयुर्वेदिक महाविद्यालयातून बीएएमएसची पदवी मिळवली. त्यानंतर त्यांनी १०८ रुग्णवहिकेवर वैद्यकीय अधिकारी म्हणून काही काळ सेवा दिली. परंतु त्यात मन रमले नाही. म्हणून २०१७ पासून एमपीएससीची तयारी सुरू केली. त्यांचे एक भाऊ हे डॉक्टर, तर दुसरे विना अनुदानित शाळेत शिक्षक आहेत. त्यांना केंद्रीय सनदी अधिकारी अजय खर्डे व जात पळताळणी समितीचे उपआयुक्त दिनकर पावरा यांची प्रेरणा मिळाली.

दोनदा यशाची हुलकावणी
पहिल्याच प्रयत्नात राज्यसेवा पूर्व परीक्षा व मुख्य परीक्षा पास केली. परंतु दु्दैवाने मुलखतीत १३ मार्कस कमी मिळाल्याने संधी हुकली. २०१९ मध्ये देखील ६ गुणांनी पोस्ट गेली. तरीही न हारता अभ्यास सुरूच ठेवल्याने २०२० मध्ये पुन्हा परीक्षा देऊन यशाला गवसणी घातली.

चार वर्षे पुस्तके हेच जग
मागील चार वर्षापासून स्वतः ला एका खोलीत बंंदिस्त करून पुस्तके हेच जग करून घेतले होते. यश थोडक्यात हुलकावणी देत होते. त्यात कोरोनाची भर म्हणून दोन वर्षे परीक्षाच होऊ शकली नाही. धजापाणी सारख्या अतिदुर्गम भागातील एक विद्यार्थी एमपीएससी परीक्षेत राज्यात दुसरा येऊ शकतो. त्यांचा हा गावापासूनचा सुरू झालेला संघर्षमय स्पर्धा परीक्षेचे यश प्रेरणादायीच आहे.

राष्ट्रपुरुषांना अभिप्रेत कार्य करण्याचा प्रयत्न
स्पर्धा परीक्षेसाठी तुम्ही फार हुशारच असले पाहिजे असे नाही. प्रयत्न, जिद्द चिकाटी व संघर्ष करायची तयारी हिच यशाची गुरुकिल्ली आहे. छत्रपती शिवाजी महाराज, बिरसा मुंडा, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, शाहू महाराज, डॉ. आंबेडकर यांच्या विचारांची प्रेरणा मिळाली आहे. प्रशासकीय सेवेत त्यांना अभिप्रेत कार्य करण्याचा प्रयत्न करेन.
डॉ. अर्जुन पावरा

बातम्या आणखी आहेत...