आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सारंगखेडा यात्रोत्सव:विद्यार्थी टेंट पॅकिंगने गाजवतायत अश्व मैदान, स्पर्धेत नागपूर, नवी मुंबई, इंदूर, लोणी, शिरपूरचे विद्यार्थी सहभागी

रणजित राजपूत | सारंगखेडाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अश्व खरेदी विक्रीसाठी प्रसिद्ध असलेल्या सारंगखेडा यात्रोत्सवातील चेतक फेस्टिव्हलमध्ये यंदा डे-नाइट अश्व क्रीडा स्पर्धांचा चित्तथरारक अनुभव अश्वप्रेमी घेत आहेत. येथे टेंट पॅकिंग स्पर्धा सर्वाधिक गाजत आहे. यात महाराष्ट्रातील नागपूर, नवी मुंबई, लोणी, शिरपूर, नंदुरबार तर मध्य प्रदेशातील इंदूर येथील ८ ते १६ वर्ष वयोगटातील विद्यार्थी अश्व क्रीडा मैदान गाजवत आहेत. देशभरात सारंगखेडा ता.शहादा येथील श्री एकमुखी दत्ताच्या जयंतीपासून भरणाऱ्या यात्रेला आता ग्लोबल मान्यता मिळाली आहे. यंदा या यात्रेत अन्य सर्व कार्यक्रम रद्द करून चेतक फेस्टिव्हलच्या माध्यमातून केवळ घोड्यांच्या स्पर्धा, क्रीडा स्पर्धा व घोडा विक्रीवर लक्ष केंद्रित केले आहे. यात्रेला यंदा प्रथमच अश्व क्रीडा स्पर्धा घेण्यात येत असून त्या डे- नाइट होत आहेत. चेतक फेस्टिव्हलचे आयोजक जयपालसिंह रावल यांनी अश्वप्रेमींसाठी विशेष सुविधा प्रदान केल्या. अश्व प्रेमींच्या तक्रार निवारणासाठी कार्यालयही आहे. राजस्थान, पंजाब, हरियाणा, महाराष्ट्र, गुजरात या राज्यातील १८०० हून अधिक घोडे विक्रीसाठी आले आहेत.

चेतक फेस्टिव्हलच्या स्पर्धा
पाच खांब रोवून झिगझॅग पद्धतीने घोड्यांनी पळणे, टेंट पॅकिंग अर्थात चालत्या घोडेस्वाराने भाल्याच्या साहाय्याने तंबू उखडून फेकणे, बॅरल अर्थात पाण्याच्या टाक्यांना स्पर्श न करता घोड्यांनी पळणे अशा या स्पर्धा आहेत. या स्पर्धेत घोडेस्वार म्हणून प्रवरानगर येथील व्ही के. पाटील सैनिकी शाळेचे शिक्षक दीपक धाकणे, १४ विद्यार्थी सोबत आले.

तीन मैदानांवर रंगतेय अश्व स्पर्धा
विशेष म्हणजे घोड्यांच्या क्रीडा स्पर्धेसाठी तीन मैदाने आहेत. तीन फूट खड्डा करून मऊ माती टाकली आहे. क्रीडा स्पर्धेत घोड्यांच्या पायांना इजा होऊ नये, यासाठी विशेष काळजी घेतली गेली आहे. सरावासाठी २१० बाय १६० स्क्वेअर फूट जागेवर दुसरे मैदान आहे. बाजूला घोड्यांना पळण्यासाठी वेगळे मैदान बनवण्यात आले आहे.

विशेषत: शिवरायांच्या
युद्धकलेतील स्पर्धा

विद्यार्थी हे घोड्यांवर स्वार होऊन घोड्यांच्या क्रीडा स्पर्धेत सहभागी होत असून या अनोख्या खेळांत या विद्यार्थ्यांत कमालीची आवड निर्माण असल्याचे पाहायला मिळाले. हे सर्व खेळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात युद्धात वापरले जायचे,असे आयोजक जयपालसिंह रावल यांनी यावेळी सांगितले.

यंदा भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
^यात्रेला दहा दिवस होऊनही श्री दत्त प्रभूंच्या दर्शनासाठी भाविकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळाली. दहा वर्षानंतर असे चित्र पाहतोय. २८० भाविकांनी दूध, पेढे, केळे यांची तुला केली. यात्रेस चांगला प्रतिसाद आहे.
भिकन पाटील, सचिव, श्री एकमुखी दत्त मंदिर विश्वस्त मंडळ

प्रथमच डे-नाइट अश्व स्पर्धा
^श्री दत्त प्रभूंच्या यात्रेपासून घोड्यांच्या बाजाराला प्रारंभ झाला. साडे तीनशे वर्ष या यात्रेला झाली आहेत. आता ही यात्रा सर्वदूर पसरली आहे. यात्रेला खूप प्रतिसाद मिळत आहे. घोड्यांच्या शर्यती व्यतिरिक्त डे नाइट अश्व स्पर्धा प्रथमच सारंगखेड्यात होत आहेत.
जयपालसिंह रावल, आयोजक, चेतक फेस्टिव्हल, सारंगखेडा

बातम्या आणखी आहेत...