आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यलो अलर्ट जारी:शहादा, नंदुरबारात बरसल्या आनंदसरी पिकांना संजीवनी ; शेतकऱ्यांना दिलासा

शहादा/नंदुरबार15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहादा शहरासह परिसरात रविवारी दुपारी तीन वाजता अचानक विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे नागरिकांची चांगलीच धावपळ झाली. तर रस्त्यावर बाजारात हातगाड्यांवर व्यवसाय करणाऱ्यांची त्रेधा उडाली. या पावसामुळे वातावरणात कमालीचा गारवा निर्माण झाला असून पुन्हा सायंकाळी साडेपाच वाजेपासून पावसाची रिपरिप सुरू झाली ती रात्री उशीरापर्यंत सुरूच होती. नंदुरबार शहरातही शनिवारी रात्री पाऊस झाला, रविवारी मात्र ढगाळ वातावरण होते. शहादा परिसरात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस; व्यावसायिकांची उडाली त्रेधा शहादा तालुक्यात १० ते १२ दिवसांच्या विश्रांतीनंतर झालेला पाऊस शेतकऱ्यांना दिलासा तर पिकांना संजीवनी देणारा ठरला.

नंदुरबार शहरात शनिवारी रात्री तासभर पाऊस
शहरात शनिवारी सायंकाळी पावणेआठ वाजेच्या सुमारास पाऊस झाल्याने गणेश विसर्जन मिरवणुकांमुळे रस्त्यावर साचलेला गुलाल वाहून गेला. तासभर सुरू राहिलेल्या या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला. गुरुवारपासून उकाडा होत असताना गणेश विसर्जन मिरवणुकीत थोडासाच पाऊस झाला. तर दुसऱ्या दिवशी सायंकाळी झालेल्या पावसाने रस्ते स्वच्छ होण्यास मदत झाली.

पालिकेच्या सात ते आठ वाहनांनी रस्त्यावरील गुलाल वाहून नेला. उर्वरित गुलाल मात्र पावसाने वाहून निघाला. दरम्यान रविवारी दुपारपासून ढगाळ वातावरण होते. गेल्या तीन दिवसांपासून रोज सायंकाळी पाऊस पडत आहे. त्यामुळे उकाडा आणि गारवा असा वातावरणातही बदल हाेत आहे. जिल्ह्यात शहाद्यातही जोरदार पाऊस झाला. यंदा पावसाची कृपादृष्टी आहे. मात्र दुर्गम भागात अधिक पाऊस झाल्याने काही भागात पिकांचे नुकसान झाले आहे.

जोरदार पाऊस होण्याची शक्यता : ११ सप्टेंबरपासून राज्यात मान्सून सक्रिय झाला आहे. सोमवारपासून त्याची तीव्रता वाढण्याचा अंदाज असल्याने पुढील तीन ते चार दिवस काही ठिकाणी मुसळधार ते अती मुसळधार पावसाची शक्यता आहे. धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात देखील १२ व १४ सप्टेंबरला यलो अलर्ट आहे. त्यामुळे जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे.

बातम्या आणखी आहेत...