आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहरापासून अवघ्या ८ कि.मी.अंतरावर लोणखेडा येथील कृषी महाविद्यालयाच्या बाजूस आणि तापी नदीच्या पवित्र कुशीत दोन वर्षापासून सुमारे ४ एकर जागेत भव्य असे श्री भगवान विष्णू यांचे मंदिर उभारले जात आहे. यात २१ टन वजन, ११ फूट लांब शेषशायी भगवान विष्णूंची अष्टधातू मूर्ती स्थापनेसाठी तयार करण्यात आली आहे. श्री नारायण भक्तिपंथाचे मुख्य प्रवर्तक संत लोकेशानंद महाराज यांच्या प्रेरणेने हे निर्माण कार्य सुरू आहे. हे केवळ मंदिर नसून, नारायणपूरम तीर्थ म्हणून ओळखले जाणार आहे. गेल्या दोन वर्षांपूर्वी मंदिराच्या कामाची पायाभरणी करण्यात आली होती.
हळूहळू मंदिर बांधकाम प्रगतिपथावर आहे. एकूण चार एकर जागेमध्ये श्री नारायणपूरम मंदिराचे बांधकाम सुरू असून, मंदिराचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर भाविकांच्या सर्व सुविधांचे नियोजन केले जाणार आहे. हे मंदिर बांधकामासाठी अहमदाबाद येथील आर्किटेक सोमपुरा यांच्यात देखरेखीत केले जात आहे.
मंदिराच्या बांधकामासाठी वापरण्यात येत असलेला दगड सुमारे दहा हजार वर्षे टिकेल, असे सांगण्यात आले. श्री भगवान विष्णू नारायणची मूर्ती तयार करण्याचे काम पूर्ण झाले असून, मूर्ती मध्य प्रदेशातील इंदूर या ठिकाणी श्री संत लोकेशानंदजी महाराज यांच्या आश्रमात ठेवल्याची माहिती श्री नारायणपूरम मंदिर ट्रस्टचे शांतिलाल पाटील यांनी दिली.
अशी झाली श्री नारायण भक्ती पंथाची स्थापना अन् प्रसार
संतश्री लोकेशानंद महाराज यांना वयाच्या अवघ्या १३ व्या वर्षी भक्तिबोध झाला. त्यानंतर घर, परिवार त्याग करून थेट सद्गुरू श्री अच्युतानंद महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली नारायण भक्ती तपस्या सुरू केली. अनेक वर्षे तप साधना केली. त्यानंतर श्री नारायण भक्ती पंथ स्थापनेचा संकल्प घेऊन, भव्य दिव्य शेषशायी भगवान विष्णूंची मूर्ती स्थापनेचा संकल्प घेतला. तेव्हापासून श्री नारायण भक्ती पंथाची महती प्रसिद्ध होऊ लागली आहे.
अशी आहे विष्णूंची मूर्ती
अलौकिक तेज असलेल्या या विशाल विष्णू भगवान मूर्तीच्या नाभीतून भगवान ब्रह्मा तर उजव्या हाताजवळ भगवान शंकर विराजमान आहेत. सुदर्शन चक्र, शंख, गदा, पद्म, सेवेत हनुमानजी सहित गरुडही विराजित आहेत. तर भगवान विष्णूंच्या मूर्तीसह माता लक्ष्मी यांची मूर्ती स्थापन होणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.