आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विशेष रेल्वे:आदिवासींच्या मदतीला धावली कोरोना विलगीकरण रेल्वे, नंदुरबार जिल्ह्यातील कोरोना रुग्णांवर उपचारांसाठी 31 डब्यांची विशेष रेल्वे सज्ज

नंदुरबार (रणजित राजपूत)9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आजपासून दाखल होणार रुग्ण
  • कृत्रिम प्राणवायू, कूलर, पिण्याच्या पिण्याची सुविधा

कोरोनाचा संसर्ग सातपुड्याच्या दऱ्याखोऱ्या, पाड्यांवर पोहोचल्याने आदिवासी बांधवही कोरोनाच्या कचाट्यात सापडले आहेत. दररोज ८०० रुग्ण पाॅझिटिव्ह येत असल्याने बेडही अपूर्ण पडू लागले आहेत. एकूण रुग्णसंख्या ९ हजारांपर्यंत पोहोचली असून, ४३० बाधितांचा कोरोनाने आतापर्यंत बळी घेतला आहे. वाढत्या रुग्णांमुळे नंदुरबार जिल्ह्यासाठी ३१ डब्यांची कोविड विलगीकरण रेल्वे तयार करण्यात आली आहे. खान्देशातील हा पहिलाच प्रयोग आहे.

फलाट क्रमांक ३ प्रतिबंधित क्षेत्र : फलाट क्रमांक तीनवर ही कोविड विलगीकरण रेल्वे असल्याने इतर प्रवासी येथे येऊ नयेत यासाठी हा परिसर पूर्णपणे बंदिस्त करण्यात आला असून, प्रतिबंध क्षेत्र म्हणून आरक्षित करण्यात आला आहे.

एका डब्यात फक्त १६ रुग्णांवर होतील उपचार ही विशेष रेल्वे गाडी नंदुरबार रेल्वे स्टेशनवरील फलाट क्रमांक ३ वर उभी आहे. प्रत्येक डब्यात कमी लक्षणे असलेल्या १६ कोविड रुग्णांना उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयातून येथे हलवण्यात येणार आहे.

कृत्रिम प्राणवायू, कूलर, पिण्याच्या पिण्याची सुविधा
कोविड केअर सेंटरमध्ये जशी व्यवस्था असते तशीच व्यवस्था प्रत्येक डब्यात करण्यात आली आहे. प्रत्येक सीटवर अंथरूण टाकण्यात आले आहे. पिण्याचे पाणी, कृत्रिम प्राणवायूचे सिलिंडर, रुग्णांना उकाड्याचा त्रास होऊ नये यासाठी डब्याच्या बाहेर कूलर ठेवून आतमध्ये थंडगार वारा पोहोचेल अशी व्यवस्था केली आहे. एवढेच नव्हे तर प्रत्येक डब्यावर गोणपाटाचे आच्छादनही अंथरण्यात आले आहे.

कमी लक्षणे असलेल्यांवर होतील उपचार : खासदार डॉ.हीना गावित
वाढत्या कोविड रुग्णांमुळे केंद्र शासनाकडे रेल्वे आयसोलेशन कोचची मागणी केली होती. त्यानुसार ती उपलब्ध झाली आहे. कोचमध्ये सुविधा देण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू आहे. कमी लक्षणे असलेल्या कोविडच्या रुग्णांवर उपचार होतील. डॉक्टर, परिचारिका यांचे एक पथक सेवेत असेल. -डॉ. हीना गावित, खासदार,नंदुरबार

बातम्या आणखी आहेत...