आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामध्य प्रदेश राज्यातील व महाराष्ट्र राज्याच्या सीमेवर असलेल्या खेतिया येथे शनिवारी भरणारा आठवडे बाजार जनावरांच्या विशेषत: बैलजोडी खरेदी-विक्रीसाठी पंचक्रोशीत नावाजलेला आहे. त्यामुळे या ठिकाणी शेतकरी बैल खरेदीसाठी मोठ्या संख्येने येतात. मध्य प्रदेशातील खेतिया हे शहर परिसरातील केंद्रस्थानी असल्याने तेथील आठवडे बाजारास खूप महत्त्व प्राप्त होते. या ठिकाणी साक्री, शिरपूर, धुळे, नवापूर, नंदुरबार, अक्कलकुवा, तळोदा, शहादा, धडगाव, चोपडा आदी तालुक्यातील व्यापारी व शेतकरी बैलजोडी खरेदी-विक्रीसाठी येतात. सध्या खरीप हंगामाचा काळ सुरू असल्याने शेती तयार करण्यावर शेतकरी मोठी भर देत आहेत. सपाटीच्या जमिनीवर ट्रॅक्टरद्वारे शेतीची मशागत करता येते; परंतु डोंगराळ भागात आजही बैल जोडीच्या सहाय्यानेच शेतीची सर्व कामे केली जातात. तसेच शेतात लहान जागेतील हलक्या स्वरूपाची कामेही बैलजोडीच्या मदतीने होतात. त्यामुळे खरीप हंगामाच्या सुरुवातीला बैलजोडी खरेदीसाठी शेतकऱ्यांची मोठी कसरत असते. या वेळी सर्व गोष्टीचे दर वाढले आहेत. जनावरांच्या किमतीतही १५ ते २० टक्के वाढ झाल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. खेतिया नगर परिषदेमार्फत चालणाऱ्या या बैल बाजारात सुमारे ५०० ते ७०० बैल विक्रीसाठी येतात. यातून लाखो रुपयांची उलाढाल हाेते. शेरी, मावी, खगुणी अशा विविध जाती, प्रकारातील बैल या ठिकाणी विक्रीस आणले जातात. आठ दात असलेला पूर्ण पक्व, सहा दातांचा मध्यम तर चार दातांचा लहान बैल, अशी ओळख केली जाते. गेल्या वर्षी बैलजोडीला ८० हजार रुपये किंमत मिळाली होती .
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.