आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:पारंपरिक नृत्य स्पर्धेतून घडवले आदिवासी संस्कृतीचे दर्शन; जिल्ह्यातील 10 पथके झाली सहभागी

तळोदाएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

आदिवासी विकास विभगाच्या एकात्मिक प्रकल्प कार्यालयाच्या वतीने शहरातील सांस्कृतिक भवनात आदिवासी पारंपारिक भव्य नृत्य स्पर्धा झाली. दहा कला पथकांनी सहभागी होऊन नृत्य सादर केले.

तळोदा शहरातील आदिवासी सांस्कृतिक भवनात मंगळवारी ही स्पर्धा पार पडली. स्पर्धेचे उद्घाटन देवी याहा मोगी मातेच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आली. या स्पर्धेच्याप्रसंगी सहायक प्रकल्प अधिकारी एन. एम. साबळे, बी. एफ. वसावे, के. सी. कोकणी, डी. जी. वाणी, लेखाधिकारी एस. टी. पावरा, शिक्षण विस्तार अधिकारी एन. डी. ढोले, बी. आर. मुंगळे आदींसह मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. या स्पर्धेचे परीक्षक म्हणून भगदरी आश्रमशाळेचे मुख्याध्यापक प्रेमसिंग पाडवी व के. डी. गावित सैनिकी महाविद्यालयाचे प्राचार्यांनी कामकाज केले.

पारंपरिक नृत्यांनी वेधले लक्ष
प्रतापपूर (ता.तळोदा) येथील नृत्य पथकाने पोळा व दिवाळी सणातील नंदीबैलाची जाणीव जागृती हे आदिवासी पारंपारिक नृत्य सादर केले. पाणबारी (ता.धडगाव), भांग्रापाणी (ता.अक्कलकुवा) तसेच कोठार (ता.तळोदा) आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांनी पारंपारिक आदिवासी होळी नृत्य सादर केले. कात्री (ता.धडगाव) व अमोनी (ता.तळोदा), पिंपळखुंटा (ता.अक्कलकुवा) येथील व शिर्वे मुलींच्या आश्रमशाळेच्या पथकाने आदिवासी पारंपारिक लग्नातील नृत्य सादर केले. अंमलपाडा (ता.तळोदा) येथील कला पथकाने आदिवासी तूर नृत्य तर रोझवा (ता.तळोदा) येथील नृत्य व कला पथकाने सोंगाड्या पार्टी व नृत्य सादर करून आदिवासी पारंपारिक दिवाळी महोत्सवाची अनुभूती आणून दिली.

पिंपळखुटा कलापथकाने पटकावला प्रथम क्रमांक
स्पर्धेत पिंपळखुटा येथील कलापथकाच्या समारंभातील आदिवासी पारंपारिक नृत्याने प्रथम क्रमांक पटकावला. त्यांना ५ हजारांचे पारितोषिक देऊन गौरवले. भांग्रापाणी येथील कलापथकाच्या पारंपारीक होळी नृत्याने द्वितीय तर रोझवा येथील नृत्य पथकाच्या सोंगाड्या पार्टी या नृत्यप्रकाराने तृतीय क्रमांक पटकावला.