आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायेथे शहरालगत असलेल्या शहादा-पाडळदा रस्त्यावर गोमाई नदीच्या पुलाखाली नदीच्या पात्रात बेड काँक्रीट पूर्णतः निघाले असून मोठमाेठे जीवघेणे खड्डे पडले आहेत. पावसाळ्यात त्यामुळे मोठा अनर्थ घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी पुलाखालील खड्डे सिमेंट काँक्रीटने भरण्यात यावे, अशी मागणी होत आहे.
गेल्या २५ वर्षांपूर्वी पाडळदा रस्त्यावर गोमाई नदी पात्रात कमी उंचीच्या पुलाचे काम करण्यात आले. साधारणत ४० पेक्षा अधिक गावांचा संपर्क या पुलाच्या माध्यमातून येतो. परिसरातील गावांच्या दृष्टीने हा पूल अतिशय महत्त्वाचा आहे. मात्र पावसाळ्यात गोमाई नदीला सातत्याने मोठे पूर येतात. त्यात पुलाची उंची कमी असल्याने अनेक वेळा पूल पुराच्या पाण्याखाली जातो अन् वाहतूक पूर्ण ठप्प होते. पूल बांधला तेव्हापासून तर आतापर्यंत पुलाच्या बांधकामाबाबत अनेक तक्रारी करण्यात आल्या होत्या. सार्वजनिक बांधकाम विभागाने या पुलाकडे आजही दुर्लक्ष केले आहे.
दोन वेळा नदीच्या पुरात पुलाच्या बाजूला असलेला भराव वाहून गेला होता. पुलास लावलेले लोखंडी पाइपचे संरक्षण कठडे चोरीस गेल्याने सध्याच्या परिस्थितीत पुलाला एकही कठडा नाही. त्यामुळे पावसात नदीला पूर आल्यानंतर नागरिक व वाहनधारक जीव मुठीत धरूनच ये-जा करतात. शहरातील दोन व्यक्ती पुलावरून जात असताना तोल जाऊन नदीच्या पुरात वाहून गेल्याच्या घटनाही यापूर्वी घडल्या आहेत. तरीही बांधकाम विभागाने या पुलाला अद्याप संरक्षक कठडे बांधलेले नाहीत.
खड्ड्यांमुळे आतापर्यंत गेलेत सहा जणांचे बळी
पुलाचे बांधकाम झाले तेव्हापासूनच पुलाच्या खाली असलेल्या भागात बेड काँक्रीट निकृष्ट दर्जाचे केल्याने अनेक वेळा त्याची दुरुस्ती झाली. पुराच्या पाण्यामुळे मोठमोठे खड्डे तयार होतात. आजही मोठे जीवघेणे खड्डे आहेत. पुराच्या पाण्यात ते लक्षात येत नाही. त्यामुळे पोहणाऱ्या व्यक्ती त्या खड्ड्यात अडकतात.आतापर्यंत या पद्धतीने सहा जणांचा बळी गेला आहे. त्यात तीन शालेय विद्यार्थ्यांचा समावेश आहे. बांधकाम विभागाने तरी दखल घेतलेली नाही. पावसाळा सुरू होण्यापूर्वी पुलाखालील बेड काँक्रीटला पडलेले खड्डे बुजवावेत, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.