आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरोग्य सेवा:साक्षात समोर मृत्यू दिसत असतानाही जिल्हा रुग्णालयात 122 परिचारिकांनी 12 तास केली कोविड रुग्णांची सेवा

नंदुरबार2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोनाच्या पहिल्या लाटेत परिचारिकांनी अत्यंत प्रतिकूल अशा परिस्थितीत काम केले. रोज मृत्यूच्या बातम्या यायच्या. मृत्यू केव्हाही दारात उभा राहील, याची भीती असायची. अविवाहित परिचारिकांसाठी जीवनच नवीन होते. त्यात मृत्यूची भीती होती. विवाहित परिचारिकांसमोर लहान मुले, कुटुंब समोर दिसायचे. अशाही परिस्थितीत प्रचंड उकाडा असताना तोंडावर मास्क, अंगात किट घालून तब्बल १२ तास रुग्णांची सेवा करण्याचा तो प्रकार अंगावर शहारा आणणाराच होता. अशाही परिस्थितीत रुग्णांची सेवा करून नंदुरबारच्या शासकीय जिल्हा रुग्णालयाच्या १२२ परिचारिकांनी आपले कर्तव्य निभावले.

कोरोना काळात परिचारिकांनी केलेल्या कामाची माहिती घेतली असता त्यांची सेवा दिसून आली. नंदुरबारच्या दुसऱ्या लाटेत तर मरणाऱ्यांची संख्या मोठी होती. त्यामुळे अधिक काळजीचे दिवस परिचारिकांसाठी असायचे. एकदा किट अंगात घातले की शरीरात नुसता घाम गळायचा. पण या सर्व त्रासातूनही त्यांनी कधीही आपला सेवा धर्म सोडला नाही. मासिक पाळी, असो लघुशंकेसारखे प्रसंग हा त्यांच्यासाठी कठीण काळ होता. या काळात अनेक परिचारिकांना भोवळ आली. कधी चक्कर येऊन त्या पडल्या; परंतु या सर्व बाबी त्यांनी कधीच बाहेर येऊ दिल्या नाहीत.

परिचारिकांचा अनुभव जीवनाचा अर्थ सांगणारा
डॉक्टरांपेक्षा काकणभर अधिक काम करणाऱ्या परिचारिकांनी कधीही आपली तक्रार पुढे केली नाही. कोरोना काळातील परिचारिकांचा अनुभव हा कठीण तसेच जीवनाचा अर्थ सांगणारा ठरला. सर्वच परिचारिकांनी तब्बल बारा ड्यूटी केली. पण कधीही या बाबतीत तक्रार केली नाही. डॉ. राजेश वसावे, वैद्यकीय अधिकारी, सिव्हिल हॉस्पिटल, नंदुरबार

एकाच वेळी पाहिले अनेक मृतदेह
कोरोनात रुग्णांना गोळ्या देणे, ऑक्सिजन लावणे, त्यांचा हात धरून खाटेपर्यंत पोहोचवणे या सर्व जबाबदाऱ्या परिचारिकांवरच होत्या. त्यावेळेस नातेवाइकांचीही साथ नव्हती. मात्र परिचारिका याच नातेवाइकांचे काम करीत होत्या. अनेक मृतदेह पाहण्याचा प्रसंगही त्यांच्या वाट्याला आला. रुग्णांना सुटी दिल्यानंतर ते भारावून जात. तर परिचारिकाही गहिवरत होत्या.

परिचारिकांचे काम न विसरण्यासारखे
रुग्णांची संख्या वाढल्यानंतर शासनाने काही तात्पुरत्या स्वरूपात परिचारिकांना काम दिले. या सर्व परिचारिकांना नंतर सेवामुक्त करण्यात आले. तिसऱ्या लाटेत कोरोना रुग्णांची संख्या वाढली. मात्र मृतांची संख्या कमी झाली. तब्बल दोन वर्ष अंगावर किट घालून प्रत्येक रुग्णाशी संवाद साधत परिचारिकांनी केलेले काम नंदुरबारकर कधीच विसरणार नाहीत.

बातम्या आणखी आहेत...