आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासध्या तालुक्यातील असलोद येथील जन्मत:च दाेन्ही हात नसलेल्या आठवर्षीय दिव्यांग गणेश माळी या संघर्षमय जीवन जगणाऱ्या जिद्दी मुलाचा विषय चर्चेचा ठरला आहे. लहानग्या गणेशसाठी आता संपूर्ण उत्तर महाराष्ट्रातून विविध सेवाभावी संस्था, संघटना, लोकप्रतिनिधी व सामाजिक कार्यकर्त्यांकडून मदतीचा ओघ सुरू झाला आहे.
आमदार राजेश पाडवी यांनी दिव्यांग गणेश व त्याच्या पालकाची भेट घेऊन राज्य शासनाकडून आवश्यक ती मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले. तर ६ फेब्रुवारी रोजी शिरपूर येथील भूपेंद्र पटेल यांच्या फ्रेंड सर्कल फाउंडेशनतर्फे कृत्रिम हात बसवण्यासाठी गणेशला साेबत घेऊन उदयपूरला रवाना होणार असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते अनिल भामरे यांनी दिली.
परिस्थिती गरिबीची असल्याने गणेशचे शिक्षण, पालनपाेषण कसे करणार, या विवंचनेत त्याचे वडील असायचे. परंतु त्यांना धीर देत कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतल्याने दिलासा मिळाला. गणेशला भेटून आमदार पाडवी प्रभावित झाले. मला शिकायचे आहे, असे त्याने ठासून सांगितले. मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून जास्तीत जास्त मदत मिळवून देण्याचे आश्वासन पालकांना दिले. या वेळी उपसरपंच विजय पवार, ग्रा.पं. सदस्य दीपक गिरासे, संतोष चव्हाण, संजय जगताप, जि.प. शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र पाटील उपस्थित होते.
गणेशला शिक्षणासाठी मदत मिळावी, मोफत शस्त्रक्रिया करून त्याला कृत्रिम हात बसवण्यासाठी शिरपूर येथील आमदार अमरीश पटेल यांच्या मार्गदर्शनात भूपेंद्र पटेल यांच्या सेवाभावी संस्थेतर्फे मंदाणेचे माजी उपसरपंच अनिल भामरे परिश्रम घेत आहेत. पटेल व सहकाऱ्यांनी असलोद येथे प्रत्यक्ष भेटून दिव्यांग गणेशला सहकार्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार ६ रोजी त्यास मोफत कृत्रिम हात बसवण्यासाठी उदयपूर येथे नेण्यात येणार आहे. तसे झाल्यास त्याचा संघर्ष काहीअंशी कमी हाेईल, अशी अपेक्षा आहे.
हुशार, जिद्दी गणेशला मदत हाेणे अपेक्षित
दिव्यांग गणेश माळी या मुलाच्या अपंगत्वावर मात करण्यासाठी आवाहन केले होते. त्यास चांगला प्रतिसाद मिळाला. गरिबीमुळे गणेशच्या कुटुंबास मदतीची गरज आहे. गणेश हुशार असून आपण पालकत्वाची भूमिका स्वीकारली.- अनिल भामरे, सामाजिक कार्यकर्ते, मंदाणे.
गणेश पायांच्या मदतीने करताे सर्व कामे
दिव्यांग गणेश हा अतिशय हुशार व चाणाक्ष आहे. त्यास नियमित शाळेत जाण्याची आवड व उच्च शिक्षणाची इच्छा आहे. दोन्ही हात नसल्याने तो पायाच्या बोटांमध्ये पेन ठेवून लिखाण करतो. भोजन करताना पायात चमचा अडकवून जेवण करतो. कपडेही परिधान करण्यासह विविध दैनंदिन कार्यही स्वतःच करतो. त्याची जिद्द बघून सारेच आश्चर्यचकीत होतात.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.