आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशाळेतील घोळ कमी व्हावा, यासाठी २०१३ पासून अस्तित्वात आलेली सरळ प्रणाली मुख्याध्यापकांसह शिक्षकांची डोकेदुखी ठरू लागली असून आधारकार्डच्या मिसमॅचमुळे विद्यार्थ्यांची माहिती अपडेट करताना शिक्षकांची दमछाक होत आहे. आधार कार्ड दुरुस्तीचे काम सेवाकेंद्राऐवजी प्रत्येक केंद्र शाळांना दिल्यास शिक्षकांची दमछाक कमी होऊन आधार लिंकिंगसह सरळ प्रणालीचे काम सरळ होणार असल्याच्या प्रतिक्रिया शिक्षकांमध्ये उमटत आहेत. शालेय शिक्षण विभागामार्फत विद्यार्थी लाभाच्या विविध योजनांची अंमलबजावणी केली जाते. अंमलबजावणी करताना शाळास्तरावरून वारंवार माहिती घ्यावी लागते, ही माहिती तयार करून वरिष्ठ कार्यालयास पाठवण्यास शिक्षक, मुख्याध्यापक व प्रशासकीय यंत्रणा यांचा बरासचा वेळ खर्च होतो.
त्यामध्ये वेळेची बचत होऊन सदर वेळ विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी उपलब्ध व्हावा यादृष्टीने विद्यार्थी माहिती सरळ प्रणाली विकसित करण्यात आली आहे. तसेच सदर प्रणालीमुळे विद्यार्थी लाभाच्या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करता येईल, असा उद्देश या प्रणालीचा होता. या प्रणालीमुळे शिक्षकांना हायसे वाटले होते; परंतु प्रणाली राबवताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. प्रणालीत पुन्हा २०१९ मध्ये आधारकार्ड लिंकची सक्ती करण्यात आली. यानंतर हा घोळ अधिक प्रकर्षणाने जाणवू लागला.
मुख्याध्यापक हे संगणक निरीक्षर आहेत. ते वयस्क आहेत. त्यामुळे बऱ्याचशा शाळेत शिक्षकांना ही लिपिकांची कामे साेपवली जात असून त्यामुळे शिक्षणावर त्याचा विपरित परिणाम दिसत आहेत. पहिलीच्या विद्यार्थ्यांची माहिती मराठीत लिहिली जाते. तसेच आधारकार्डवर अनेक चुका असतात. काही आधारकार्डवर जन्म वर्ष असते. तर काहींच्या आडनावात घोळ असतो.
आधार अपडेटसाठी जातोय वेळ
आधार लिंक ही चांगली संकल्पना आहे. ते होणे आवश्यक आहे. नंदुरबार जिल्ह्यात अनेक शाळांमध्ये आधार कार्ड मिसमॅच असल्याच्या बाबी समोर येत आहेत. मी स्वत: आधारकार्ड तज्ज्ञांना बोलावून माझ्याकडील मिसमॅचचे प्रमाण ९९ टक्के कमी केले. सध्या आधारकार्ड दुरुस्ती, अपडेशनचे काम हे सेवा केंद्राकडून केले जात आहे. यामुळे विद्यार्थ्यांचा अधिक वेळ जात आहे. हेच काम शाळा स्तरावर सोपवल्यास सोपे होईल. -कुंदन पाटील, मुख्याध्यापक, काेकणी पाडा, ता. नंदुरबार
आधारकार्ड दुरुस्तीच्या दिल्या सूचना
आधारकार्डला प्रमाण मानून आधारकार्ड मिसमॅच दुरुस्त करण्याच्या सूचना प्रत्येक मुख्याध्यापकांना केल्या आहेत. आडनावातील स्पेलिंग दुरुस्त, जेंडरच्या बाबतीत दुरुस्ती मुख्याध्यापकांनी कराव्यात, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे मिसमॅचची समस्या आपोआप दुरुस्त होऊन सरळ प्रणालीचा घोळ दुरुस्त होईल. या संदर्भात शाळांच्या काही अडचणी असतील त्या सोडवसाठी निश्चितच शिक्षण विभागाचा प्रयत्न राहणार आहे. युनूस पठाण, उपशिक्षणाधिकारी, जि. प. प्राथमिक
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.