आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअहंकाराची मस्ती परमेश्वराशिवाय कोणीही उतरवू शकत नाही. अखंड विश्वात परमेश्वरच अशी सत्ता आहे जी अहंकाऱ्याचा अहंकार उतरवू शकते. अहंकार व गर्व हे सर्वनाशाचे मूळ आहे. त्यामुळे कुणीही अहंकार करू नये, त्याचा त्याग करावा, असे आवाहन वेदमूर्ती, भागवताचार्य अविनाश जोशी महाराज यांनी केले. नंदुरबार शहरातील कामनाथ महादेव मंदिर परिसरातील लक्ष्मीनारायण नगरात श्रीमद्भागवत कथा सप्ताह सुरू आहे. कथेचे निरूपण करताना भागवताचार्य अविनाश जोशी महाराज बोलत होते. ते कथा निरूपणात पुढे म्हणाले की, जे चांगले कार्य करत आहेत त्यांना नेहमी पाठबळ द्यावे. त्यामुळे चांगले कार्य करणाऱ्यांच्या मागे खंबीरपणे उभे रहा. ज्याच्या स्मरणात परमेश्वर अखंड राहील, परमेश्वर त्यास चरणांच्या पुढे घेतो. परमेश्वराच्या चरणांच्या पुढे जागा मिळवायची असेल तर परमेश्वराचे नाम संकीर्तन करायला हवे. भागवत कथेला लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत भाविक भक्तांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. अनेक भाविकांनी यावेळी भक्तिगीतांच्या तालावर ठेका धरला होता. भाविक कथा श्रवणात तल्लीन होत आहेत. शनिवारी श्रीकृष्ण जन्मोत्सव होणार श्रीमद्भागवत ज्ञानयज्ञ कथेचे ५ जूनपर्यंत दररोज सायंकाळी ६.३० ते ९ या दरम्यान निरूपण करण्यात येणार आहे. ४ जून रोजी श्रीकृष्ण जन्मोत्सव, ६ जून रोजी भागवत संहिता पारायणाची समाप्ती होऊन महाप्रसादाचे वितरण करण्यात येणार आहे. कथा श्रवण व महाप्रसादासाठी उपस्थितीचे आवाहन लक्ष्मीनारायण नगर, कामनाथनगर, जय गुरुदेव नगर, रॉयल पार्क, मारुती नगरातील आयोजकांनी केले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.