आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वप्नपूर्ती:शासकीय परिचारिका महाविद्यालयात प्रवेश क्षमतेत ऐंशीने वाढ; आदिवासी मुलींना संधी

नंदुरबारएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

प्रसूती तज्ज्ञ सहायक परिचारिका आणि वृद्ध आजार तज्ज्ञ सहायक परिचारिकेच्या प्रत्येकी दहा जागांवरून आता प्रत्येकी पन्नास जागांना महाविद्यालयात मंजुरी मिळाल्याने यंदा परिचारिकेच्या १०० जागांसाठी शासकीय परिचारिका महाविद्यालयात वर्ग सुरू होणार आहेत. त्यामुळे आदिवासी मुलींना मोठी संधी उपलब्ध होणार आहे. तसेच यंदापासून शिष्यवृत्ती सुरू करण्यात आल्याने विद्यार्थिनींमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. नंदुरबार शहरात जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या मागील बाजूस शासकीय परिचारिका महाविद्यालय असून, या महाविद्यालयात सध्या एएनएम व जीएनएम अशा दोन कोर्ससाठी प्रत्येकी दहा जागा आतापर्यंत मंजूर होत्या. या जागा आता प्रत्येकी पन्नास झाल्या असून, एएनएम व जीएनएम या दोन्ही कोर्ससाठी आता १०० जागा असतील. त्यामुळे दर वर्षी परिचारिका होण्याचे स्वप्न आता आदिवासी मुलींना पूर्ण करता येणार आहे.

बीएस्सी नर्सिंगसाठी १०० जागांचा पाठवला प्रस्ताव एवढेच नाही तर बीएस्सी नर्सिंग कोर्ससाठी १०० जागांकरिता प्रस्ताव पाठवण्यात आला असून, लवकरच तो प्रस्ताव मंजूर होणार आहे. यातून परिचारिकांना विदेशात आरोग्य सेवेत काम करण्याची संधी उपलब्ध होणार आहे. नंदुरबार जिल्ह्यात एंजर नर्सिंग कॉलेज, पथराई येथील कॉलेज व डॉ. भरत वळवी यांनी सुरू केलेले महाविद्यालय असे तीन परिचारिका महाविद्यालय सुरू आहेत. बीएससी नर्सिंग कोर्सला आरोग्य क्षेत्रात विश्व मान्यता आहे. त्यामुळे दुर्गम भागात राहणाऱ्या आदिवासी मुलींना विदेशात चांगल्या पगाराची नोकरी मिळू शकणार आहे.

आता नंदुरबारातच होणार परीक्षा : पूर्वी परीक्षा केंद्र धुळे येथे होते. यंदा परीक्षा केंद्रासही मंजुरी मिळाली असून, नंदुरबारात आता परिचारिका महाविद्यालयातील परिचारिकांना परीक्षा देता येणार आहे. त्यामुळे मोठी गैरसोय टळली आहे. एवढेच नाही तर राज्यातील परिचारिकांचे पेपर तपासणी केंद्रालाही नंदुरबारला मंजुरी मिळाल्याने स्ट्राँग रूम व पेपर तपासणीसाठी नंदुरबार हे केंद्र जाेडले जाणार आहे.

परिचारिका शिक्षणासाठी मुलींना शिष्यवृत्तीही मंजूर ^नंदुरबार येथील परिचारिका महाविद्यालयात यापूर्वी शिष्यवृत्ती मिळत नव्हती. आता ती मंजूर झाल्याने या मुलींना आता ३५० ते ७०० रुपयांपर्यंत शिष्यवृत्ती मिळणार आहे. त्यामुळे त्यांना शिक्षण घेणे सोयीचे होणार असून, या अभ्यासक्रमातून अनेकांना चांगली नोकरीची संधी मिळणार आहे. -डॉ चारूदत्त शिंदे, जिल्हा शल्य चिकित्सक,नंदुरबार

बातम्या आणखी आहेत...