आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहादा:शहादा तालुक्यात मिरची पीक लागवडीवर भर; चांगला बाजारभाव मिळण्याचा अंदाज

शहादा11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यात पावसाच्या आगमनापूर्वीच शेतकऱ्यांनी मिरची लागवडीवर भर दिला आहे. भविष्यात मिरचीला चांगला बाजार भाव मिळण्याची शक्यता बघता शेतकऱ्यांच्या कल मिरची या पिकावर लक्ष केंद्रित झालेले आहे.

धुळे जिल्ह्यात दोंडाईचा व नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार मिरचीचे मुख्य बाजारपेठ असून उत्पादनदेखील जास्त होते. मात्र गेल्या दोन वर्षांपासून शहादा तालुक्यानेदेखील मिरचीचे मोठे उत्पादन घेऊन जिल्ह्यात बाजारपेठेत नाव झाले आहे. साधारणत मे महिन्यापासूनच मिरचीची व कापसाची लागवड करायला सुरुवात होते. सध्या आता बहुसंख्य शेतकरी मिरचीची लागवड करण्यात कार्यमग्न झालेले आहेत. सुरुवातीला पपई व केळी या पिकांची लागवड मोठ्या प्रमाणात केली होती. नंतर मात्र पपई व केळी पिकाला भाव मिळाला नाही. व्यापाऱ्यांनी सातत्याने शेतकऱ्यांना त्रास दिला. आंदोलने झाली. शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. शेतकरी कर्जबाजारी व्हायला लागला होता. हा सारा प्रकार बघता व ऊसदेखील बऱ्याच शेतकऱ्यांचा शिल्लक राहिल्याने मिरची लागवडीवर भर दिला आहे.इतर जिल्ह्यातून मिरचीची रोपे मागून मजुरांमार्फत त्याची लागवड केली जात आहे. ठिबक सिंचन योजनेच्या मार्फत मिरची पिकाला पाण्याची व्यवस्था केली जात आहे.

तीन एकर शेतीत मिरचीची लागवड
माझी सात एकर शेती असून, त्यापैकी तीन एकर शेतीत मिरचीची लागवड करीत आहे.नाशिक येथून मिरचीची रोपे मागवलेली आहेत.प्रत्येक रोपाची किंमत दीड रुपये असून, तीन एकर मिरचीची लागवड करण्यासाठी एक लाख रुपये खर्च अपेक्षित आहे.खर्च वाढण्याची शक्यता राहील.तीन एकर मध्ये सहाशे ते सातशे क्विंटल मिरचीचे उत्पादन होण्याची शक्यता आहे.मिरचीला बाजारभावदेखील चांगला मिळतो. दहा लाख रुपयांपर्यंत उत्पन्न येईल, असा अंदाज आहे, अशी प्रतिक्रिया डामरखेडा येथील शेतकरी मोहन पाटील यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...