आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरोग्याची काळजी:हिवताप अन् कीटकजन्य आजारांविषयी जनतेमध्ये जागृती निर्माण करण्यावर भर; जिल्हा हिवताप अधिकारी अपर्णा पाटील यांनी दिली माहिती

नंदुरबार11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जून महिना हिवताप प्रतिरोध महिना म्हणून पाळण्यात येणार आहे. या अनुषंगाने हिवताप व इतर कीटकजन्य आजारांविषयी जनतेमध्ये जागृती निर्माण करण्याबरोबर त्याच्या प्रतिरोध उपायांविषयी शहर तसेच ग्राम पातळीवर माहिती देणार आहे, अशी माहिती हिवताप अधिकारी अपर्णा पाटील यांनी दिली.

प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी जिल्ह्यात आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत डास उत्पत्ती स्थानांचा शोध घेऊन दूषित स्थाने नष्ट करणे, ज्या भागात मोठ्या प्रमाणात डासांची घनता आहे अशा ठिकाणी धुरीकरण करण्यात येणार आहे. एक दिवस कोरडा दिवस पाळणे, ताप रुग्ण सर्वेक्षण करणे, डासांच्या घनतेचे सर्वेक्षण करणे, रॅली, प्रदर्शने, वैद्यकीय अधिकारी सभा घेणे, नागरिकांमध्ये जनजागृती होण्यासाठी हस्तपत्रके, पोस्टर्स, बॅनर्स याद्वारे जनजागृती आदी उपक्रम राबवण्यात येत आहेत. हिवताप हा ‘प्लाझमोडियम’ या परोपजीवी जंतूमुळे होणारा व मादी ॲनाफिलिस डासाच्या चावण्यामुळे पसरणारा आजार आहे. डेंगी व चिकुनगुन्या हे विषाणूजन्य आजार आहेत. त्यांचा प्रचार एडीस इजिप्ती प्रकारच्या डासामुळे होतो. हत्तीरोग हा बुचेरेरिया बॅन क्रॉफ्टी या परोजपजीवी जंतूमुळे होणारा आजार आहे. या आजाराचा प्रसार क्यूलेक्स प्रकारच्या डासामुळे होतो. हे सर्व आजार वेळीच औषधोपचार करून बरे करता येतात. मात्र, वेळीच उपचार न झाल्यास ते प्राणघातक ठरू शकतात. तसेच एखाद्या हिवताप रुग्णास त्वरित उपचार उपलब्ध झाला नाही, तर त्याच्या शरीरातील हिवतापाचे जंतू डासांमार्फत निरोगी व्यक्तींच्या शरीरात जातात. परिणामी विना उपचारीत अथवा अर्धउपचारीत रुग्ण हिवतापाच्या प्रसारासाठी कारणीभूत ठरतो.

नागरिकांनी सहकार्य करावे
रात्री झोपताना कीटकनाशक भारीत मच्छरदाणीचा वापर करावा. शक्यतो अंग पूर्ण झाकले जाईल असे कपडे घालावेत. शाळेत जाणाऱ्या मुलांना डास विरोधक क्रिम लावूनच शाळेत पाठवावे. गावाभोवतालच्या मोठ्या पाण्याच्या साठ्यांमध्ये ओढा, डबके, तलाव, मोठे हौद आदी डास अळीभक्षक गप्पी मासे सोडण्यात यावेत. हिवताप नियंत्रणासाठी जनतेचा सहभाग आवश्यक असल्याने सर्व नागरिकांनी सहकार्य करावे,असे आवाहन जिल्हा हिवताप अधिकारी अपर्णा पाटील यांनी केले आहे.

हिवताप रोखण्यासाठी ही घ्या काळजी
हिवताप आजार होऊ नये यासाठी आपले घर व घराजवळचा परिसर स्वच्छ ठेवावा. गावाच्या किंवा घराच्या सभोवताली असणारी डबकी, खड्डे बुजवावेत. गटार वाहती करावी. इमारतीच्या टाक्या, हौद यांना घट्ट झाकणे बसवावेत किंवा घट्ट कापड बांधावे, पाणी साठवण्याची भांडी आठवड्यातून एकदा रिकामी करून घासून पुसून कोरडी करावीत. पाण्याच्या साठ्यांची झाकणे नेहमी बंद ठेवावेत. फ्रिज, कुलर, कुंड्या, डंबे व अन्य वस्तूमध्ये पाच दिवसांपेक्षा जास्त काळ पाणी साठून राहणार नाही याची काळजी घ्यावी.

हिवतापाची अशी असतात लक्षणे : तीव्र ताप, थंडी वाजणे, डोकेदुखी, मळमळ, हुडहुडी भरणे, घाम येणे. हिवताप जंतूचे आपल्याकडे आढळून येणारे मुख्यत्वे दोन प्रकार आहे. प्लाझमोडियम व्हायवॅक्स, प्लाझमोडियम फॅल्सीपॅरम. हिवतापाचा उपचार कुठलाही ताप हिवताप असू शकतो, त्यामुळे तापाची लक्षणे जाणवायला लागल्यानंतर हिवतापाची चाचणी करुन घेतली पाहिजे.

बातम्या आणखी आहेत...