आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ब्रँडसाठी प्रयत्न सुरू:सातपुडा परिसरात भगरवर प्रक्रिया करणाऱ्या सहा युनिटमुळे आदिवासी महिलांना रोजगार

रणजित राजपूत |नंदुरबार2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

२०२३ हे वर्ष आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष म्हणून साजरे करण्यात येणार आहे. नंदुरबार जिल्ह्यातील सातपुडा, मोलगी परिसरात एक तृणधान्य असलेल्या भगरचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतले जात आहे. जवळपास १८०० महिलांना भगर उत्पादनातून आर्थिक लाभ मिळत आहे.

तृणधान्यांमध्ये जीवनसत्त्व मोठ्या प्रमाणावर मिळत असल्याने तृणधान्याला माेठी बाजारपेठ उपलब्ध होत आहे. सातपुड्यातील भगरला ब्रँड मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू असून यापुढे सातपुड्याची सेंद्रिय भगर या नावाने नंदुरबार जिल्ह्याची नवी ओळख निर्माण हाेणार असल्याची माहिती कोळदा कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख तथा वरिष्ठ शास्त्रज्ञ राजेंद्र दहातोंडे यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना दिली.

नंदुरबार जिल्ह्यात सातपुडा पर्वत रांगेत तृणधान्यांचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतले जाते. सातपुडा पर्वत रांगेसह जिल्ह्यात ३ हजार ८०० हेक्टर क्षेत्रात भगरचे उत्पादन घेतले जाते. हा आकडा २०२३ मध्ये दुप्पट होणार असून भगरचे उत्पादन ७ हजार ६०० हेक्टरवर घेतले जाणार आहे. अलिकडे भगरला जागतिक स्तरावर मागणी आहे. आदिवासी महिलांना सातपुडा या पर्वतीय भागात भगरचे उत्पादन घेण्यासाठी अनुकूल स्थिती आहे. आदिवासी भागात दादर, ज्वारी याऐवजी नागलीच्या भाकरीला पसंती मिळत आहे. तर मोठ्या शहरांत नागली व भगरला मोठ्या प्रमाणावर मागणी आहे, असेही दहातोंडे यांनी सांगितले. यासाठी अक्कलकुवा- मोलगी परिसर शेतकरी उत्पादक कंपनीला निती आयोगाचा निधी दिला जाणार आहे.

भगर उत्पादनासाठी सहा युनिट तयार; १८०० महिलांचा सहभाग
सातपुडा महिला आर्थिक महामंडळ व जिल्हा यंत्रणा यांच्या मदतीने ६ युनिट तयार हाेवून कार्यान्वित झाले आहेत. लोक संचालित साधन केंद्राशी ९०० महिला जुळल्या असून भगर उत्पादन प्रक्रियेत साधारण १८०० महिला प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या जुळल्या आहेत. पूर्वी कच्च्या भगरचा दर १६ ते १८ रुपये प्रती किलो असा होता. आता त्यासाठी ३२ रुपये दर मिळत आहे. भगरवर प्रक्रिया केल्यानंतर तयार भगर साधारण १२० ते १३० रुपये प्रती किलाे दराने विक्री हाेते. भगर प्रक्रियेसाठी कार्यान्वित एका युनिटची किंमत दीड ते तीन लाख रुपये इतकी आहे. त्यांच्या माध्यमातून भगरवर प्रक्रिया हाेते. .

भगरपासून निर्मित लाडू, बिस्किटांना मागणी
भगरपासून इडली, डोसा, बिस्कीट, लाडू, चकली तयार केले जातात. नंदुरबार जिल्ह्यात लाडू, बिस्कीट व चकली तयार करून ते विक्री केली जातात. यामुळे महिलांना रोजगार तर मिळालाच शिवाय भगरच्या दरातही वाढ झाली.

यातून या भागातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला वाव मिळत आहे, असे दहातोंडेंनी सांगितले. शासकीय कृषी महाविद्यालयाचे डॉ.संजय बाेराळे हे भगरवर अधिक संशाेधन करून मार्गदर्शन करतात. दरम्यान, कोळदा येथील कृषी विज्ञान केंद्रात तृण धान्यावर चर्चासत्र घेण्यात आले. उद्घाटन आमदार राजेश पाडवी यांच्या हस्ते झाले.

बातम्या आणखी आहेत...