आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराखान्देशाची कुलदैवत कानुबाई मातेला डिजेच्या तालांवर अपूर्व उत्साहात सोमवारी निरोप देण्यात आला. सकाळी ९ वाजेपासून विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली. दुपारी ३ वाजेला शेवटच्या कानुबाईचे विसर्जन करण्यात आले. जवळपास ८०० हून अधिक कानुबाई मातेला निरोप देण्यात आला. पारंपरिक गाणे गात फुगडया खेळत कानुमातेला निरोप देण्यात आला. पाताळगंगा नदी यंदा कोरडीठाक पडल्याने टँकरने पाणी पुरवण्यात आले. काय लागस तुले सांगी दे माय माले, यासह विविध पारंपरिक अहिराणी गीतांनी परिसर दणाणून गेला होता.
नंदुरबार शहरासह ग्रामीण भागात श्री कानुबाई मातेची रविवारी स्थापना करण्यात आली होती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गत दोन वर्षात कानुबाई मातेच्या मिरवणुकीत पाहिजे तसा उत्साह नव्हता. यंदा रात्रभर सर्वत्र कानुबाईचा उत्साह दिसून आला. कानुबाई भक्तांनी पारंपारिक गीते, नृत्यांनी रात्रभर जागून काढली. जवळपास प्रत्येक गल्लीत कानुबाई मातेची स्थापना करण्यात आली होती. यंदा अनेक ठिकाणी मंडप टाकण्यात आले होते. कानुबाई मातेच्या मिरवणुकीत महिलांनी फुगडया खेळत खान्देशी नृत्य करत मातेला निरोप दिला. खान्देशी गाण्यांच्या तालावर श्री संत गजानन महाराज मंदिराजवळ पाताळगंगेच्या तिरावर कानुबाईचे विसर्जन करण्यात आले. मिरवणुकीत महिला, युवतींची संख्या लक्षणीय होती. गुलालांची उधळण करीत ही मिरवणूक काढण्यात आली.
फुगड्या, गरबा नृत्याने आणली रंगत
सकाळपासून छत्रपती शिवाजी महाराज मार्ग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावरून कानुबाईची मिरवणूक काढण्यात आली. ठिकठिकाणी महिलांनी गरबा नृत्य केले. तेली गल्ली, पाटील गल्ली, भाटगल्ली, जळकाबाजार यांसह विविध कॉलनी परिसरात कानुबाई मातेची स्थापना करण्यात आली होती. कानुबाई माय की जय, असे म्हणत मिरवणुका काढल्या. अहिराणी गीतांवर महिलांनी ठेका धरला. पाण्याचे चार टँकर उभे केले होते. या पाण्याने कानुबाई मातेचे विधिवत विसर्जन करण्यात आले.
भाविकांची भागवली तृष्णा... नंदुरबार येथील नेताजी सुभाष बाबू मित्र मंडळ व मोहन बापू चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने साक्री नाका परिसरात विसर्जनासाठी येणाऱ्या भाविकांची तृष्णा भागवली. या वेळी शुद्ध व फिल्टर पाण्याचे सुमारे ४६ जार पाणी वाटप करण्यात आले. मंडळाचे संस्थापक अध्यक्ष ईश्वर मोहन चौधरी यांच्या उपस्थितीत तसेच नरेंद्र चौधरी, सुरेश घरटे, पुंडलिक चौधरी, लखन चौधरी उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.