आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशेकडो वर्षांची परंपरा असलेली सातपुड्यातील राज संंस्थानची ओळख असलेली अक्कलकुवा तालुक्यातील काठी येथील राजवाडी होळी ही दि. ६ मार्च रोजी उत्साहात साजरी होणार आहे. काठी येथील या राजवाडी होळीला सुमारे ७७६ वर्षांची परंपरा असून ग्रामस्थ व संस्थानाच्या वारसदारांनी ही परंपरा टिकून ठेवली आहे. काठी येथील होळीच्या उत्सवाने सातपुडा वासीयांमध्ये चैतन्याचे वातावरण पसरले आहे. काठी येथे राजवाडी होळीचा उत्सव साजरा करण्यासाठीची तयारी पूर्ण झाली आहे. काठी संस्थानचे वारसदार पृथ्वीसिंह पाडवी, महेंद्रसिंह पाडवी व काठी येथील ग्रामस्थांनी ही परंपरा अविरतपणे जोपासली आहे. या होळीच्या नियोजनासाठी काठी ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंच स्नेहा पाडवी तसेच गावातील ग्रामस्थ हे परिश्रम घेत आहेत.
७० फूट पेक्षाही अधिक लांबीचा दांडा
काठी येथील होळीसाठी लागणारा सुमारे ७० फूट पेक्षाही अधिक लांबीचा दांडा (बांबू) हा भाविक ग्रामस्थ गुजरात राज्यातून पायपीट करीत आणत आहेत. अनादी काळात आदिवासी बांधवांचे कुलदैवत राजापांठा व गांडा ठाकूर यांनी एकत्र येत या उत्सवाला प्रारंभ केल्याचे सांगितले जाते. सुमारे १२४६ या सालापासून काठी संस्थांचे पहिले राजे उमेदसिंह सरकार यांनी या होलिकोत्सवाला राजवाडी होलिकोत्सव म्हणून प्रारंभ केला. ती आजही आहे.
पहाटे पाच वाजता होते होळी प्रज्वलित
होळीचा दांडा आणल्यानंतर सर्वप्रथम राज घराण्यातील सदस्य त्याची विधिवत पूजा अर्चा करतात. हा पवित्र दांडा कोणत्याही प्रकारच्या हत्याराचा वापर न करता हाताने खणलेल्या खड्ड्यात गाडला जातो. त्याला गूळ, हार, कंगण, दाळ्या, खजूर आदी पदार्थांचे नैवेद्य दाखवले जाते. भाविक ढोल ताशांच्या गजरात रात्रभर बेधुंद होऊन नाचत असतात. पहाटे सुमारे पाच वाजेच्या दरम्यान होळी मातेला प्रज्वलित केली जाते. होळी मातेने पेट घेताच मोरवीबाबा, बुध्या,धानका, दोडे रामढोलच्या तालावर फेर धरतात.
मानवजातीच्या कल्याणाची प्रार्थना
सातपुड्यातील आदिवासी बांधवांचा अविरतपणे सुरू असलेला होळी हा महत्त्वाचा सण आहे. पूर्वजांनी सुरू केलेली सांस्कृतिक परंपरा आणि संस्कृतीचे संवर्धन करण्याचा सातपुडा वासीयांचा आणि आम्हा वारसदारांचा प्रयत्न आहे. होळी माता संपूर्ण मानव जातीचे कल्याण कर मानव जाती वर येणारे संकट दूर कर अशी मनोभावे पूजा अर्चा होळी मातेला केली जाते. - पृथ्वीसिंह पाडवी, वारसदार, काठी संस्थान
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.