आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहाद्यातील बालाजी वेफर्स दुकानातील सेल्समन व चालकाची गाडी थांबवून रोकड लंपास करणाऱ्या टोळीस दोंडाईचा येथून ताब्यात घेण्यात आले. या लुटमार प्रकरणात बालाजी वेफर्सच्या चालकाचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. त्याला ताब्यात घेतल्यानंतर पुढील उलगडा झाला. या प्रकरणी पाच आरोपींना अटक केली आहे.
१७ ऑक्टोबर २०२२ सायंकाळी ६.१५ वा. सुमारास औरंगपूर ते शहादा दरम्यान वळण रस्त्यावर मालाचे पैसे गोळा करून बालाजी व्हेफर्सचे सेल्समन सुनील तिरमले व चालक अजय कोळी हे टाटा मॅजिक चारचाकी वाहनाने जात होते. हे वाहन थांबवून त्यांना चाकूचा धाक दाखवत चौघांनी तिरमले यांना हातावुक्क्यांनी मारहाण केली. त्यांच्या हातातील ८७, ८७१ रुपये रोख, तीन हजाराचा मोबाइल जबरीने हिसकावून मोटार सायकलने पळ काढला. या प्रकरणाचा शोध घेतला असता चालकचा लुटमार करणाऱ्यांचा साथीदार असल्याची गुप्त माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक पी. आर. पाटील यांना मिळाली. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बालाजी वेफर्सच्या वाहनावरील चालक अजय कोळी यांस दोंडाईचा येथे जावून ताब्यात घेतले.
त्याचा चुलत मामा भारत कोळी व त्याचे इतर साथीदार आकाश पाटील, ऋषिकेश गिरासे, आयुष मोरे व एक अल्पवयीन मुलगा (सर्व रा. दोंडाईचा) यांनी मिळून लुटमार केल्याची कबुली दिली. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने भारत भगवान कोळी (२१), आकाश खंडू पाटील (२१), ऋषिकेश ऊर्फ विच्छू भगवान गिरासे (२१ दोन्ही रा. दोंडाईचा), आयुष सुनील मोरे (१९ रा. बामणे), एक अल्पवयीन मुलगा यांना (दोंडाईचा जि. धुळे) येथून ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून गुन्ह्यातील ८७ हजार ८०० रुपये रोख, २ लाख रुपये किमतीची दुचाकी गाडी, ५० हजार रुपये किमतीची गुन्ह्यात वापरलेली डिस्कव्हर मोटार सायकल, तीन हजाराचा मोबाईल व गुन्ह्या करतेवेळी वापरलेला चाकू असा एकूण तीन लाख ४० हजार ८०० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.