आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागरीब व बेघर असलेल्या लोकांसाठी त्यांना हक्काचे घर मिळावे या उद्देशाने शासनाने पंतप्रधान घरकुल योजना, शबरी घरकुल योजना, रमाई घरकुल योजना सुरू केली. मात्र घर बांधकामासाठी अनुदानाची रक्कम वेळेवर आणि पुरेशी मिळत नसल्याने लाभार्थ्यांचे घरकुल अपूर्णावस्थेत असल्याने लाभार्थ्यांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे.
घरकुल बांधण्यासाठी ग्रामीण भागात एक लाख ५० हजार रुपये पर्यंत निधी देण्यात येतो. निधी ऑनलाईन असल्याने टप्प्याटप्प्याने लाभार्थ्यांना खात्यात पैसे जमा होत असतात. घरकुल पूर्ण होण्यासाठी कमीत कमी दोन वर्षे लागत असतात. अनेक लाभार्थ्यांचे अनुदान त्यांच्या बँक खात्यावर पडले नसल्याने घरकुल अर्धवट अवस्थेत आहेत. महागाईमुळे १,५०,००० रुपयात घरकुल पूर्ण होत नाही. वेळेवर हप्ते पडत नसल्याने लाभार्थी तळोदा येथे दररोज रोजंदारी बुडवून पंचायत समितीमध्ये चकरा मारत असतात. तिथे गेल्यावर अधिकारी उडवाउडवीची उत्तरे देत असतात. गेल्या आठ महिन्यापासून ग्रामपंचायतीवर प्रशासक असल्याने लोकप्रतिनिधीही घरकुलाबाबत दुर्लक्ष करत आहेत. एसटी बस बंद असल्याने रोज खाजगी वाहनाने जाणे लाभार्थ्याला परवडत नाही. अनेक लाभार्थ्यांचे दोन-दोन वर्ष झाले तरी निधीअभावी घर अपूर्णावस्थेत आहे. वास्तविक शहरी भागात घरकुलासाठी ३ लाखापर्यंत निधी दिला जातो. ग्रामीण भागात हाच निधी दीड लाख इतका दिला जातो. घर बांधकामासाठी आज सिमेंटचा दर ३५० प्रति बॅग, वीटांचा दर हजारी ५००० पर्यंत तर लोखंड ८० रुपयांपर्यंत आहे. बांधकामासाठी मजुरीही २० ते ३० टक्क्यांहून वाढली आहे. शासनाने याकडे लक्ष घालावे व निधीत वाढ करावी अशी मागणी लाभार्थ्यांकडून होत आहे. पावसाळा सुरू होण्यास अद्याप दोन-अडीच महिने शिल्लक असून या अवधीत घर बांधून होईल, अशी अपेक्षा व्यक्त झाली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.