आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहाराष्ट्र नवनिर्माण सेने (मनसे)चे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार नंदुरबार शहरात मनसे पदाधिकाऱ्यांनी हनुमान मंदिरात हनुमान चालीसाचे पठण केले. धुळे रस्त्यावरील हिंदू एकता मित्र मंडळाच्या हनुमान मंदिरात लाऊडस्पीकरद्वारे हनुमान चालीसा पठण करण्यात आला. यावेळी परिसरात पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता.
याप्रसंगी मनसेचे जिल्हाध्यक्ष विजय विश्वनाथ चौधरी, नंदुरबार तालुकाध्यक्ष राकेश माळी, विधानसभा क्षेत्र अध्यक्ष सुनील कोकणी, विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष प्रवीण जोशी, जिल्हा सचिव पवनकुमार गवळे, उपशहराध्यक्ष राम ठक्कर, बबन पाडवी, अनिल पेंढारकर, अशोक माळी, उमेश मदने यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी मनसेचे जिल्हाध्यक्ष चौधरी म्हणाले की, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार हनुमान मंदिरामध्ये हनुमान चालीसा म्हणण्यात आला. तसेच यापुढेही त्यांच्या सूचनेनुसार स्वाक्षरी मोहीम राबवण्यात येईल. या मोहिमेत मनसेच्या कार्यकर्त्यांसह नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाध्यक्ष चौधरींनी केले. कायद्याच्या चौकटीत राहून मंदिरासमोर हनुमान चालीसा म्हटल्याने कुणावरही गुन्हे दाखल झाले नाहीत. नंदुरबार, नवापूरच्या ३९ प्रार्थनास्थळांनी पोलिसांकडे भोग्यांची परवानगी मागितली आहे. त्यासाठी पोलिसांकडे रितसर अर्ज देण्यात आला.
शहाद्यात नमाज पठणावेळी भोंग्याचा वापर नाही; भूमिकेचे स्वागत
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील अनधिकृत भोंगे उतरवण्याबाबत शासनासह देशवासीयांना आवाहन केले होते. त्यास पोलिस प्रशासन व शहरातील मुस्लीम बांधवांनी साथ देत नमाज पठणावेळी भोंग्याचा वापर केला नाही. त्यामुळे सामाजिक भान बाळगता राज ठाकरेंच्या आवाहनानुसार जेथे भोंग्याचा वापर झाला नाही त्या मशिदींच्या परिसरात कोणालाही त्रास होणार नाही, याची काळजी घेण्याबाबत आदेश दिले होते. यावरून शहादा शहरात कुठेही हनुमान चालीसा पठणाचा कार्यक्रम झाला नाही. शहरातील मुस्लीम बांधवांची भूमिका स्वागतार्ह आहे. परंतु ही मागणी फक्त एका दिवसाची नसून यावर कायमस्वरूपी अंमलबजावणीची गरज असल्याने ध्वनिक्षेपक लावण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने सांगितल्याप्रमाणे कारवाई होणे अपेक्षित आहे.
जोपर्यंत मशिदींवरील अनधिकृत भोंगे उतरवण्याबाबत ठोस कारवाई होत नाही तोपर्यंत पक्षाध्यक्ष राज ठाकरेंच्या आदेशानुसार मनसेच्या वतीने स्वाक्षरी मोहीम, हनुमान चालीसा पठण, मंदिरांना भोंगे वाटप आदी कार्यक्रम सुरु करण्यात येतील, असे येथील पोलिसांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष राजेश्वर सामुद्रे, शहराध्यक्ष सुहास पाटील, उपाध्यक्ष रोहित खैरनार, सचिव कौस्तुभ मोरे, तालुका सचिव अमेय राजहंस, योगेश सोनार, दीपक लोहार, यश शिंपी आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.