आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
नंदुरबार जिल्ह्यातील दुर्गम भागात २१ किमी पायपीट करून गाढवावर औषधी नेऊन तेथील आदिवासींना आरोग्यसेवा पुरवताना मोठी आव्हाने होती. ती आव्हाने समर्थपणे पेलून गेल्या काही वर्षांपासून सुरू असलेला मध्य प्रदेशाच्या सीमेजवळील झापी परिसरातील वैद्यकीय अधिकारी डॉ. मालती ठाकरे यांचा अनेक वर्षांपासूनचा संघर्ष त्यांच्याच शब्दांत....
महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकाला असलेल्या नंदुरबार जिल्ह्यातील दुर्गम भागात राहणाऱ्या नागरिकांच्या शुश्रूषेसाठी २००६ पासून प्रयत्नशील आहे. २०१२ मध्ये तोरणमाळच्या पायथ्याशी असलेल्या झापी येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात वैद्यकीय अधिकारी म्हणून नियुक्ती झाली. तिथपर्यंत जाण्यास रस्ता नव्हता. डोंगरदऱ्यांतून सुमारे २१ किलोमीटर पायपीट केल्यानंतर चार तासांनी झापी प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात पोहोचायचे. चार दिवस याच भागात मुक्कामी राहायचे. आठवड्यातून एकदा गाढवावर औषधे न्यावी लागायची. त्यानंतर या भागात कच्चा रस्ता झाला. सोलार दिवे आले. त्यामुळे आता दीड वर्षापासून काहीसा संघर्ष कमी झाला आहे. दुर्गम भागात काम करताना मिळणारे समाधान खूप मोठे आहे.
बीएएमएसचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर २००६ मध्ये मानसेवी डॉक्टर म्हण्ून अक्कलकुवा येथे रुजू झाले. त्यानंतर २०१२ मध्ये तोरणमाळ आरोग्य केंद्रात काम करण्याची संधी मिळाली. तोरणमाळहून पुन्हा खाली २१ किमी अंतरावरील झापी गावात तपासणीसाठी जावे लागायचे. या भागात वीजही नव्हती. सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत रुग्णांची तपासणी करायचे. रात्री अंगणवाडी सेविका, आशा वर्कर यांच्या घरी झाेपायचे. पण या भागात काम करताना कधीही वाईट अनुभव आला नाही. नऊ वर्षांत दोन ते तीन सर्पदंश झालेल्या रुग्णांवर उपचार केल्याने त्यांचा जीव वाचला. झापीपासून काही अंतरावर मध्य प्रदेश आहे. त्यामुळे या भागातील आदिवासी भाषेवर हिंदीचा प्रभाव आहे. सुरुवातीला आदिवासी भाषा समजत नव्हती. त्यामुळे परिचारिका आर. पी. चौधरी या संवाद साधण्यासाठी मदत करायच्या. दोन वर्षांनंतर या भागात रुळले. सुरुवातीला गर्भवती महिला तपासणीसाठी येत नसत. आता कच्चा रस्ता तयार झाल्याने वाहने झापीपर्यंत येतात. तसेच दीड वर्षापूर्वीच या भागात सोलार दिवे आले. चार दिवस एक पथक दुर्गम भागात तर दुसरे पथक तोरणमाळला आरोग्य सुविधा पुरवते. आठवडी बाजाराच्या दिवशी गाढवावर औषधे पाठवली जातात.
पावसाळ्याच्या दिवसांत या भागात जाणे दिव्य असते. दीड वर्षात या भागात आरोग्याविषयी बऱ्यापैकी जनजागृती झाली आहे. गर्भधारणा झाल्यानंतर महिला स्वतःहून तपासणी करून घेतात. दुर्गम भागात काम करण्यास कुणीही उत्सुक नसते. मला कधीही शहरी भागाची ओढ नव्हती. आताही माझी अन्यत्र बदली झाली आहे. पण झापीचा अतिरिक्त पदभार दिला गेला. झापीला पूर्वी फायबरचे आरोग्य केंद्र होते. आता पक्की इमारत बांधण्यात आली. या भागात मोबाइलला रेंज नसते. त्यामुळे रेंज मिळवण्यासाठी डोंगरावर जावे लागते. दुर्गम भागात काम जास्त असल्याने दिवस केव्हा संपतो तेच कळत नाही. आदिवासींची सेवा करताना जो आनंद मिळतो, तो आनंद अन्य कामातून मिळू शकत नाही. तोरणमाळ, झापी, खडकी, भादल अशा परिसरातील आदिवासींचे आरोग्य चांगले राहावे यासाठी वैद्यकीय ज्ञानाचा उपयोग करते आहे.
मनापासून काम करा
अक्कलकुवा, आडगाव, राजविहीर, वाघर्डे या भागात आधी नियुक्ती होती. सन २०१२ पासून तोरणमाळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत आहे. काम कुठेही करा, ते मनापासून केले की समाधान लाभते. - डॉ. मालती ठाकरे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.