आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकोरोनाच्या प्रदीर्घ अशा दोन वर्षांच्या काळानंतर प्रथमच शाळा भरल्याने जिल्ह्यातील सर्वच शाळांमध्ये विद्यार्थी, पालक व शिक्षकांमध्ये उत्साह दिसून आला. नवागतांचे स्वागत विविध पद्धतींनी करण्यात आले. सजवलेल्या बैलगाडी, कार, ट्रॅक्टरच्या सहाय्याने विद्यार्थ्यांना शाळेत आणले. पहिल्यांदाच शाळेत दाखल झालेल्या मुलांच्या डोळ्यात अश्रू तर दुसरीपासून आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यांवर हसू असे संमिश्र चित्र पाहायला मिळाले. आकाशात फुगे सोडून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. पहिल्याच दिवशी पालिकेच्या शाळेत नगराध्यक्षा रत्ना रघुवंशी यांच्या हस्ते पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले.
बालमंदिरातील निरागस बालके मात्र हिरमुसलेली
बालमंदिरात मात्र मुलांच्या चेहऱ्यावर हिरमुसलेपण दिसले. सतत आईशी जवळीक असलेली बालके आज अचानक वर्गात दाखल झाल्याने ही मुले सारखी रडताना दिसत होती. त्यामुळे शाळेत दाखल करायला आलेल्या पालकांना शाळा सुटेपर्यंत शाळेतच थांबावे लागले. तसेच काही रडणाऱ्या मुलांसमोर मोबाईल धरून त्यांना हसवण्याचा प्रयत्न होतानाही दिसला. माेबाईलवर खेळणाऱ्या मुलांचे हसू तात्पुरते यायचे. पुन्हा रडण्याचा आवाज वर्गात येत होता. एकलव्य विद्यालयात एक हात नसलेल्या दिव्यांग पालकाने आपल्या मुलाला शाळेत आणले. तेव्हा अनेकांचे डोळे पाणावले.
बालगाेपालांसाठी पहिला दिवस ठरला आनंदी
पहिल्या दिवशी शाळांमध्ये १०० टक्के पुस्तके वाटप करण्यात आली. तसेच प्रत्येकाला गणवेश देण्यात आला. काही शाळांमध्ये नाश्त्याचेही वाटप करण्यात आले. त्यामुळे शाळेचा पहिला दिवस बालगोपाळांसाठी आनंदाचा ठरला. उत्साह ओसंडून वाहत होता.
पहिल्या दिवशी मुक्त संवादातून शिस्तीचे धडे
सकाळी विद्यार्थ्यांचे स्वागत पाठ्यपुस्तके वाटप करून झाले. एकसाथ जयहिंद, मी आत येऊ का सर, अशा काही शिस्तीचे धडे देण्यात आले. शाळेत येतांना कपडे नीटनेटके व स्वच्छ असावेत. सकाळी लवकर उठावे, असे मार्गदर्शन करण्यात आले. शिकवण्यापेक्षा मुक्त संवादावर पहिल्या दिवशी भर देण्यात आला. मेळावे, प्रभात फेरी, आनंदोत्सव याचा अनोखा संगम पहिल्या दिवशी पाहायला मिळाला.
पालिकेच्या १६ शाळांमध्ये ७०९ विद्यार्थ्यांची उपस्थिती
पालिकेच्या १६ शाळांमध्ये ११७९ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. मात्र शाळेत ७०९ विद्यार्थ्यांनीच उपस्थिती दिली. त्यामुळे अनुपस्थित विद्यार्थ्यांना शाळेत आणण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.
-भावेश सोनवणे, शिक्षण प्रशासन अधिकारी, नंदुरबार
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.