आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निषेध:सरकारच्या निर्णयाच्या निषेधार्थ जैन समाजाचा माेर्चा

नंदुरबारएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सकल जैन समाजाच्या झारखंड राज्यातील पवित्र व प्रसिद्ध तीर्थक्षेत्र सम्मेद शिखरजी परिसराला झारखंड राज्य सरकारने पर्यटन क्षेत्र घोषित केले आहे. या निर्णयावर तीव्र आक्षेप घेण्यात आला आहे. मंगळवारी नंदुरबार जैन समाजातर्फे मूक मोर्चा काढून जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आले. तसेच येथील सकल जैन समाजातर्फे दुपारी एक वाजेपर्यंत दुकाने, व्यवसाय बंद ठेवण्यात आले हाेते.

हा निर्णय त्वरित रद्द करण्याची मागणी देशभरातून होत आहे.देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह झारखंडचे मुख्यमंत्री, खासदार डॉ.हिना गावित, अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष, माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी आणि जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांना निषेधासह मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

पावित्र्य नष्ट, हिंसेची भीती
पर्यटन क्षेत्रामुळे तेथे अनेक मद्य, मांस विक्रीची दुकाने, बार आणि रेस्टॉरंट उघडली जातील. जैन समाज शांतीप्रिय, सर्वाधिक कर भरणारा समाज आहे. त्यामुळे केंद्र शासनाने लक्ष घालून झारखंड सरकारचा हा निर्णय त्वरित रद्द करण्याची मागणी सकल जैन समाज, दिगंबर जैन समाज, श्री श्वेतांबर मूर्ती पूजक जैन संघ, श्री श्वेतांबर तेरापंथी जैन संघ यांनी केली.

माेर्चात माजी आमदार रघुवंशींचा सहभाग; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
झारखंड शासनाच्या निर्णयाच्या निषेधार्थ सकल जैन समाजातर्फे शहरातून मूक मोर्चा काढण्यात आला. त्यात युवकांसह महिला, पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी हेही माेर्चात काही काळ सहभागी झाले. मोर्चानंतर शिष्टमंडळाच्या वतीने जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनावर सुरेश जैन, विरल कुवाडिया, पद्म पाटोदी, मदनलाल जैन, प्रकाश कोचर, जेठमल अंबानी यांच्यासह प्रमुख समाज बांधवांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...