आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहराजवळून जाणारा राष्ट्रीय महामार्ग तत्काळ खड्डेमुक्त करा, या मागणीसाठी येथील महामार्गावरील करण चौफुलीवर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात आले. गांधीगिरी करत खड्ड्यांभाेवती रांगाेळी काढून संबंधित विभागाचा गलथान कारभार आणि निकृष्ट दर्जाचे रस्ते या विरोधात निदर्शनेही करण्यात येऊन शासनाचे लक्ष वेधण्यात आले. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव राऊ मोरे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले.
१५ दिवसांत रस्त्याची दुरुस्ती न झाल्यास अशाच प्रकारे आंदाेलने करण्याचा इशारा आंदाेलनकर्त्यांनी दिला. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने केलेले दुर्लक्ष आणि संबंधित विभागाच्या गलथान कारभारामुळे बायपास महामार्गाची मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झाली असून, वाहनधारकांना येथून मार्गक्रमण करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. काही वेळा अपघातही घडतात.
या निकृष्ट दर्जाच्या रस्त्याची चौकशी होऊन त्वरित महामार्ग खड्डेमुक्त करावा आणि वाहनधारकांना दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष कमलेश चौधरी, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बबलू कदमबांडे, राष्ट्रवादी युवकचे शहराध्यक्ष लल्ला मराठे, तालुकाध्यक्ष दिनेश माळी, विद्यार्थी शहराध्यक्ष जयंत मोरे, युवक कार्याध्यक्ष कालू पहिलवान, राष्ट्रवादी शहर उपाध्यक्ष राजा ठाकरे, युवक उपाध्यक्ष लाला बागवान, अनमोल पाडवी, अदनान मेमन, राजू शिंदे, लखन चव्हाण, सुनील ठाकरे, मच्छिंद्र शिंदे, रवींद्र चव्हाण आदी या आंदाेलनात सहभागी झाले. दुरुस्तीसाठी दिला ‘अल्टिमेटम’ येत्या १५ दिवसांच्या आत चाैफुलीवरील रस्त्याची दुरुस्ती झाली नाही तर अशाच प्रकारे वारंवार आंदोलने केली जातील, असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे.
अपघात घडूनही वर्षानुवर्षे दुरुस्ती प्रलंबित
या चौफुलीवर साधारणपणे एक ते दीड फूट खोलीचे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमधून वाहन चालवणे चालकांना अतिशय जिकिरीचे झाले आहे. विशेषत: दुचाकी वाहन धारकांना वाहन नेणे खूप कठीण जाते. येथे गंभीर अपघात देखील घडतात. वर्षानुवर्षे हा विषय प्रलंबित राहिला असून, आंदोलने करून, निवेदने देऊनही या खड्ड्यांबाबत राष्ट्रीय महामार्ग विभागामार्फत कारवाई झालेली नाही. याचा अर्थ संबंधित विभाग अपघातांत जीवितहानीची तर प्रतीक्षा करत नाही ना, असा प्रश्न साऱ्यांना पडला आहे. येथून पुढे नवापूर चौफुलीपर्यंत जाणाऱ्या रस्त्यावरही अनेक खड्डे पडले आहेत. विशेषतः तळोदा बायपास म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रस्त्यावरील खड्ड्यांची खाेली तर दोन फुटांपर्यंत आहे. त्यामुळे वाहनधारक, सर्वसामान्य जेरीस आले आहेत. त्यांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये, असेही आंदाेलनावेळी बजावून सांगण्यात आले.
चाैफुलीवर एक-दीड फुटांच्या खड्ड्यांचे साम्राज्य
नंदुरबार शहराच्या उत्तरेला असणाऱ्या करण चौफुलीपासून शहादा, तळोदा, अक्कलकुवा व इतर राज्यांत जाण्यासाठी महामार्ग उपलब्ध आहे. तसेच या भागात जाणाऱ्या प्रत्येक वाहनाला या चौफुली मार्गेच जावे लागते. याप्रमाणे अर्धे शहरही करण चौफुली भागात वसलेले आहे. शहरातील नागरिकही बाजारात जाण्यासाठी या चौफुली मार्गेच वाहतूक करतात. वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाच्या चौफुलीवर एक ते दीड फुटाच्या खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. चार रस्त्यांची वाहतूक एकत्र आल्यानंतर तयार हाेणाऱ्या चौफुलीवरून वाहनांची वर्दळ माेठी असल्याने रस्ता चांगला असावा लागतो; परंतु येथे त्या उलट चित्र आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.