आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्य मराठी ग्राउंड रिपाेर्ट:42 लाखांचा लिलाव अन् ग्रामसभेचा बनाव; लाखमाेलाच्या खाेंडामळीत महिला मात्र बेनाम...

नंदुरबार / रणजित राजपूत3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • चौकशीनंतर सरपंचांचा फोन खंडित, ग्रामसभेचे नियम धाब्यावर

छत्रपती शिवाजी महाराज चौकात गोलाकार जमलेले सर्व गावकरी..लहानथोर, धोतरातले, पँटमधले.. पहिल्या रांगेत हिरव्या शर्टातील प्रदीप वला पाटील.

माइकवरून होणारा पुकारा... प्रदीप पाटील ४२ लाख ... एक प्रदीप पाटील ४२ लाख... दोन प्रदीप पाटील ४२ लाख... तीन टाळ्यांचा कडकडाट आणि एकच कल्ला... लिलाव जिंकणाऱ्या प्रदीप वना पाटलांना खांद्यावर घेऊन एकच जल्लाेष करणारे गावकरी आणि ‘भारतमाता की जय...’चा उद्घोष...

नंदुरबारपासून १२ किलोमीटर अंतरावरील खोंडामळी गावात भारतमातेच्या जयघोषात देवी मंदिरासाठी सरपंचपदाचा हा लिलाव सुरू होता तेव्हा गावातील एकही महिला मतदार त्या ठिकाणी उपस्थित नव्हती. महिलांची उपस्थिती दूर, महिला मतदारांची संख्या किती हेदेखील लिलाव करणाऱ्या जाणकार गावकऱ्यांना माहीत नाही. कोरोनाकाळात ग्रामसभांवर बंदी असतानाही या लिलाव सभेलाच ग्रामसभा मानून ग्रामस्थ त्यांच्या निर्णयाचे समर्थन करताना दिसतात. मंदिरासाठी ४२ लाखांची देणगी घेऊन सरपंचपदाचा लिलाव झाल्याने ही ग्रामपंचायत वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे.

गावात बच्छाव पाटील समाजाची सर्वाधिक घरे. त्यांचे कुलदैवत असलेल्या वाघेश्वरी देवीच्या मंदिराचा तीन वर्षांपूर्वी संकल्प करण्यात आला. पण निधीअभावी ते साकारू शकले नसल्याने, मंदिरासाठी देणगी देणाऱ्यास सरपंच करण्याचा निर्णय गावकऱ्यांनी घेतला. त्यानुसार छत्रपती शिवाजी महाराज चौकात हा लिलाव झाला. जयंत पाटील यांनी ३३ लाख, शिवसेनेचे मधुकर पाटील यांनी ४१ लाख तर राष्ट्रवादीच्या प्रदीप वना पाटील यांनी ४२ लाखांची बोली लावून सरपंचपद मिळविले. गावात निवडणुकीची धामधूम नाही की बॅनर नाही. लिलाव नाही, ग्रामसभा झाली असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. घटनास्थळावरील चित्रफितीत “लिलाव’ हा शब्द स्पष्टपणे आहे. सगळ्यांचे लक्ष निवडणूक आयोगाच्या चौकशीकडे लागले आहे. गावकरी प्रदीप वना पाटील यांच्या बाजूने आहेत, पण चौकशी सुरू झाल्यापासून त्यांची मोबाइल सेवा “खंडित’ आहे. ग्रामसभेला हा अधिकार असल्याचे गावकरी माेठ्या अभिमानाने सांगत आहेत.

पुढील सरपंच विठ्ठल मंदिरास देणगी देणारा
हे केवळ हिंदूचे मंदिर नाही तर ग्रामस्थांचे मंदिर असेल. निवडण्ूक झाली असती तर कोरोनाची भीती होती. शासनाला कर्मचारी नेमावे लागले असते, त्यापेक्षा या निर्णयामुळे एकोपा राहिला. पुढल्या वेळी विठ्ठल मंदिराच्या दुरुस्तीला जो देणगी देईल तो सरपंच होईल. - हेमंत पाटील

समाजमंदिराचा सर्वांना लाभ
एकोप्याने ही निवडणूक झाली. गावकऱ्यांची प्रदीप पाटलांवर श्रद्धा आहे.आणि पाटलांची वाघेश्वरी मातेवर. पिरण अब्बास पिंजारी या मुस्लिम व्यक्तीनेही मंदिरासाठी ५०१ रुपयांची देणगी दिली आहे. एक कोटीचा बांधकाम खर्च आहे. तेथे गावातील लग्नसमारंभ, दहावे-बारावे, साखरपुडे असे कार्यक्रम होतील. सर्वांना लाभ व्हावा हा हेतू आहे. - श्यामराव माळी, ग्रामस्थ

बातम्या आणखी आहेत...