आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:बचत गटाला गांडूळ खतातून पावली ‘लक्ष्मी’, तीन महिन्यांपासून गांडूळ खत निर्मिती; प्रति 6 रुपये किलोने होतेय मागणी

खेडदिगर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सत्यमेव जयते फार्मर कप स्पर्धा अंतर्गत आर्थिक समृद्धी प्रशिक्षण पूर्ण करून शहादा तालुक्यातील होळमोहिदा येथील लक्ष्मी महिला बचत गटाने गांडूळ अर्क व खताची निर्मिती केली आहे. या खताला शेतकऱ्यांकडून प्रति ६ रुपये किलोने मागणी होत आहे.

तीन महिन्यांपूर्वी गांडूळखत प्रकल्प तयार कसा करावा याचे प्रशिक्षण शहादा तालुक्यातील विविध गावात देण्यात आले होते. त्यातूनच प्रेरणा घेत होळ येथील महिला बचत गटातील महिलांनी गांडूळ खत प्रकल्प तयार केला आहे. सर्वांनी पैसे गोळा करून ५ बेड, शेणखत विकत घेतले. तर गांडूळखत बनवण्यासाठी पडलेल्या जुन्या घराची पत्रे, लाकडी दांड्या, पाने यांपासून उत्तम व मजबूत असे शेड उभारले. याला बांबू आणि केळीच्या पानांची जोड देत छत बनवले आणि सावली केली. साधारण १५ फेब्रुवारीच्या जवळपास बेड (बॅग) लावायला सुरुवात केली. तळोदा येथून गांडूळ कल्चर विकत आणून त्यात सोडले. यानंतर नित्यनेमाने पाणी टाकले. यामुळे उत्तम गुणवत्तेचे गांडूळ खत तयार झालेले असून परिसरातील शेतकरी खत घेण्यास तयार झाले आहे. याची गुणवत्ता चांगली असल्याचे परिवर्धाचे शेतकरी गुलाल पाटील यांनी सांगितले.

महिलांना प्रशिक्षण दिल्याचा झाला फायदा
बेरोजगारीवर मात करण्यासाठी महिलांसाठी गांडूळ खत प्रकल्प तयार करण्याबाबत तीन तालुक्यांमधील गावांची निवड करून प्रशिक्षण देण्यात आले. यात होळ, हिंगणी, वीरपूर, ब्राह्मणपुरी, मानमोडे, नवानगर गावांमध्ये गांडूळ खत प्रकल्प उभे झाले आहेत. या गांडूळ खतामुळे शेतकऱ्यांची जमिनीमधील कार्बन सुधारेल.
गुणवंत पाटील, तालुका समन्वयक, पाणी फाउंडेशन शहादा

बातम्या आणखी आहेत...