आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिबट्याचे दर्शन:वाण्याविहीर शिवारातील शेतामध्ये बिबट्याने वासरावर केला हल्ला; नागरिकांमध्ये भीती

अक्कलकुवा / खापर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अक्कलकुवा तालुक्यातील वाण्याविहीर (बुद्रुक ) शिवारातील शेतात ९ रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास बिबट्याने हल्ला करून वासराला ठार केल्याची घटना घडली. यामुळे परिसरातील शेतकऱ्यांसह ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेची माहिती मिळताच रात्री वन कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले.

वाण्याविहीर (बुद्रुक) शिवारातील कोमा सिंगा वळवी यांच्या शेतात गाय व तिचे वासरू बांधलेले असताना बिबट्याने अचानकपणे गायीच्या वासरावर हल्ला करून ठार केल्याची घटना घडली. या घटनेचे वृत्त पसरताच ग्रामस्थांनी या बिबट्याला पिटाळून लावले. या घटनेची माहिती वन विभागातील कर्मचाऱ्यांना कळवण्यात आली. वन कर्मचारी काळे, जाधव, कोकणी, गावित, वनमजूर वळवी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधत वन्यप्राण्यांविषयी जनजागृती करून पंचनामा केला.

परिसरातील शेतकरी तसेच ग्रामस्थांना सतर्क राहण्याचे आवाहन केले. परिसरातील शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील आपले पशुधन शेतातून आपल्या घरी सुरक्षित ठिकाणी आणले. मृतावस्थेतील वासराला त्याठिकाणी राहू देण्याचे वन कर्मचाऱ्यांनी सांगितल्याने त्याला रात्री तिथेच सोडून देण्यात आले रात्री पुन्हा बिबट्याने त्याला सुमारे एक किलोमीटर अंतरावर घेऊन जात त्या वासराला फस्त केल्याचे सकाळी निदर्शनास आले. सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास वन कर्मचाऱ्यांनी पंचनामा केला. बिबट्याच्या संचारामुळे शेतकऱ्यांसह ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून वनविभागाने त्वरित या बिबट्याचा बंदोबस्त करावी, अशी मागणी होत आहे.

वन विभागाने बंदोबस्त करावा
वाण्याविहीर गावासह परिसरातील अनेक गावांच्या शेत शिवारात गेल्या अनेक दिवसांपासून बिबट्याचा मुक्त संचार सुरू असून, हा बिबट्या शेतकऱ्यांच्या पशुधनाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान पोहोचवत असल्याने वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी तत्काळ लक्ष घालून या बिबट्याचा बंदोबस्त करावा. शेतकऱ्यांमधील व ग्रामस्थांमधील भीती दूर करावी, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे अनुसूचित जमाती मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष नागेश पाडवी यांनी केली आहे.

बातम्या आणखी आहेत...