आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मजुरांचे स्थलांतर:गुजरातने कोंबूनच पाठवले, मध्य प्रदेशात शिवीगाळ झाली, महाराष्ट्रने बससेवा दिली

नवापूरएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • मालकाने जबरदस्तीने घराबाहेर काढले, पैसे नसल्याने परिवारासह चाळीस जण निघाले मूळ गावी

(नीलेश पाटील)

रोजगारासाठी परिवारासह सुरत (गुजरात) शहरात राहत होतो. तीन लाॅकडाऊनपर्यंत घरीच होतो. काम नसल्याने पैसे मिळाले नाही. घरमालकाला भाडे देणे अवघड झाले. मालकाने जबरदस्तीने घराबाहेर काढले. पैसे नसल्याने परिवारासह चाळीस लोक गावी निघालो. सुरतजवळील कडोदरा येथून एका पिकअप गाडीत गुराढोरांप्रमाणे बसवले. प्रत्येकी मजुराकडून पाचशे रुपये घेऊन महाराष्ट्र-गुजरात सीमावर्ती भागातील नवापुरात सोडले. महाराष्ट्र सरकारने भोजनाची व्यवस्था करून आम्हाला मोफत बससेवा दिली. बसमधून महाराष्ट्र-मध्य प्रदेश राज्यातील बिजासनपर्यंत आलो. मध्य प्रदेशमधील पोलिसांनी धमक्या देत शिवीगाळ करीत सोशल डिस्टन्सन न पाळता बसमध्ये बसवून मध्य प्रदेश-उत्तर प्रदेश- ललितपूरपर्यंत सोडले, असे उदग्विग्न उद्गार गुजरातमध्ये काम करणारे परप्रांतीय मजूर अरविंद यादव यांनी दिव्य मराठीशी बोलताना काढले.

यादव म्हणाले, आता आम्ही दोन दिवसांपासून उत्तर प्रदेशाच्या ललितपूरमध्ये अडकलो आहोत. जेवण मिळत नाही. अजूनही आमचे गोरखपूर २०० किलोमीटर दूर आहे. कधी पोहोचणार हे सांगू शकत नाही. पाच दिवस झाले १ हजार ६८० किलोमीटर प्रवास करूनदेखील घरी पोहोचलो नाही. कोरोना आजाराच्या संदर्भात केवळ महाराष्ट्र सरकारने सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून मोफत प्रवास दिला. आम्ही आता कधीही गुजरात राज्यात रोजगारासाठी जाणार नाही. आमच्या गावातच आम्ही शेती करून आमच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणार आहोत.

परप्रांतीय मजुरांचे हाल पाहून राज्य परिवहन महामंडळाने सोशल डिस्टन्स ठेवून नवापूर सीमा तपासणी नाक्यावरून नि:स्वार्थ व मानवतेच्या भावनेने मोफत बस सुविधा दिली. १० मेपासून २० मेपर्यंत ही बससेवा सुरू होती. यात १ हजार ७३ बसेसमधून २३ हजार ६०६ विविध राज्यांतील परप्रांतीय मजुरांना त्यांच्या राज्यातील सीमावर्ती भागात मोफत बससेवा देऊन सोडले. यात महामंडळाने परप्रांतीय मजुरांना घरी सोडण्यासाठी १ कोटी ९६ लाख २१ हजार ३८५ खर्च केला आहे. एका बसचालकाला कोरोनाची लागण झाली. कमी पगारात उपाशीतापाशी दिवसरात्र सेवा दिल्याने उत्तर भारतीय मजुरांनी महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाचे चालक, वाहक, अधिकारी व राज्य सरकारचे आभार व्यक्त केले.

गुजरात सरकारने कुठलीही सुविधा न करता एका ट्रक टेम्पोमध्ये गुराढोरांप्रमाणे महाराष्ट्राच्या नवापूर बॉर्डरपर्यंत सोडले. परंतु नवापूर सीमा तपासणी नाक्यावर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसने सोशल डिस्टन्स घेऊन त्यांना छत्तीसगड, मध्य प्रदेश, झारखंड व महाराष्ट्राच्या विविध भागांत परप्रांतीय मजुरांना सोडले.

नवापूर चेकपोस्टवरील मोफत बससेवेचा लोखाजोखा

> मध्य प्रदेश बिजासन सीमावर्ती भागात बस संख्या ९०७, मजूर संख्या १९ हजार ८८८, खर्च एक कोटी २० लाख ६३ हजार १००

> छत्तीसगड गोंदिया सीमावर्ती भागात बस संख्या १०८, मजूर संख्या २ हजार ३७६, खर्च ६७ लाख २८ हजार ४००

> महाराष्ट्र राज्यात खानदेश, विदर्भ, मराठवाडा बस संख्या ५८, मजूर व विद्यार्थी संख्या १ हजार २७६ खर्च, ८ लाख २९ हजार ८८५

> एकूण बस संख्या १ हजार ७३, एकूण प्रवासी २३ हजार ६०६

जिवाची पर्वा न करता दोन कोटी खर्च करून सोडले

गुजरात राज्यातील परप्रांतीय मजुरांना सोडण्यासाठी महाराष्ट्र राज्यातील औरंगाबाद भागातील ७५ बस, जळगाव विभागातील ५० बस, धुळे विभागातील १०० अशा एकूण २२५ बसेसची उपलब्धता करून परप्रांतीय मजुरांसाठी दोन कोटी रुपये खर्च करून त्यांना सीमावर्ती भागात सोडले. वाहक-चालक परिवहन विभागाचे अधिकाऱ्यांनी जिवाची पर्वा न करता २४ तास सेवा देत हे कर्तव्य बजावले आहे. -राजेंद्र अहिरे, डेपो मॅनेजर, नवापूर आगार, नंदुरबार

बातम्या आणखी आहेत...