आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाद पेटला:आंतरधर्मीय विवाहावरून नंदुरबारमध्ये मध्यरात्री दंगल; दगड, विटा, काचेच्या बाटल्यांचा मारा, पोलिस जखमी

नंदुरबार2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

एका आंतरधर्मीय विवाहाची माहिती समोर येताच मंगळवारी मध्यरात्री नंदुरबार शहरातील मध्यवस्तीत सुमारे दीडशेपेक्षा अधिक लोकांच्या जमावाने परिसरात दगड, विटा आणि काचेच्या बाटल्यांचा तुफान मारा केला. त्यांना पांगवण्यासाठी गेलेल्या पोलिस ताफ्यावरही जमावाने हल्ला केला. त्यामुळे पोलिसांना अश्रुधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या. त्यानंतर पोलिसांनी किमान २७ दंगेखोरांसह आंतरधर्मीय विवाह करणाऱ्या तरुणालाही ताब्यात घेतले आहे. बुधवारी यासंदर्भात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

शहरातील महाराष्ट्र व्यायामशाळा ते अलिसाहब मोहल्ला या परिसरात मंगळवारी रात्री सव्वाअकरा वाजेच्या सुमारास मोठा जमाव दगडफेक करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांचे एक पथक तातडीने तिकडे रवाना झाले. त्या वेळी तिथे दीडशेपेक्षा अधिक आक्रमक लोकांचा जमाव होता. ते दगड, विटा आणि काचेच्या बाटल्यांचा मारा करीत परिसरातील वाहने, घरे आणि मालमत्तेचे नुकसान करीत होते. या जमावाला पांगवण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला; मात्र जमावाने पोलिसांवरच हल्ला केला. दगड आणि विटांच्या माऱ्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक किरणकुमार खेडकर, शहर पोलिस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्यासह काही पोलिस कर्मचारीही जखमी झाले आहेत.

जमाव अनियंत्रित...
हल्लेखोर जमाव इतका आक्रमक होता की दिसेल त्या वाहनाचे नुकसान करणे, बंद घरांच्या दारांवर हल्ला करणे, विद्यूत मीटर फोडणे, वीजपुरवठा करणाऱ्या वायर्स कापणे असे प्रकार सुमारे अर्धा तास सुरू होते. परिसरात काचेच्या बाटल्यांचा अक्षरश: पाऊस पडला होता. या दगडफेकीची माहिती मिळताच एकता पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक सागर भगवंतराव आहेर यांनी ती माहिती संबंधित यंत्रणेला कळवून सहकार्यांसह घटनास्थळी धाव घेतली. अन्य पोलिस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी हे देखील घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी आधी लाठीमार सुरू केला. मात्र, त्याला हिंसक जमाव काहीही जुमानत नव्हता. पोलिसांवरच हल्ला करण्यात आल्यानंतर अश्रुधुराच्या सात नळकांड्या फोडण्यात आल्या.

विवाह करणाऱ्या तरुणालाही घेतले ताब्यात....
आंतरधर्मिय विवाह करणाऱ्या तरूणालाही पोलिसांनी ताब्यात घेतले असून इतर २७ दंगेखोरांनाही बुधवारी सांयकाळपर्यंत ताब्यात घेण्यात आले होते. या तरूणाने केलेल्या विवाहासंदर्भात तपशील उपलब्ध झाला नसला तरी पोलिस त्याबाबत अधिक चौकशी करीत आहेत. सुमारे २०० जणांवर दंगल करणे, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे, पोलिसांवर जीवघेणा हल्ला करणे अशा विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

नगरमध्ये राडा : दगडफेक, जाळपोळ; १९ जण ताब्यात
नगर | छत्रपती संभाजीनगर महामार्गावर गजराज नगरजवळ किरकोळ कारणातून दोन गटात मंगळवारी रात्री झालेल्या वादातून तोडफोड व जाळपोळ करण्यात आली. क्षणातच त्याचे पडसाद शहरात उमटले. इंद्रायणी हॉटेलजवळ जमावाने आणखी एकास मारहाण केली, तर मुकुंदनगरजवळ महामार्गावर ४० ते ५० जणांच्या टोळक्याने तुफान दगडफेक केली. यात अनेक वाहनांच्या काचा फुटून नुकसान झाले. याप्रकरणी १९ जणांना ताब्यात घेण्यात आल्याचे पोलिस अधीक्षक राकेश ओला म्हणाले.