आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअक्कलकुवा तालुक्यातील सातपुड्याच्या दुर्गम डोंगराळ भागातील डेब्रामाळ या गावासाठी गेल्या वर्षात तब्बल ४८ लाख रुपयाची पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आली. या योजनेंतर्गत सोलर नळ पाणीपुरवठा योजनेसाठी लाखो रुपये खर्चही करण्यात आले. त्यामुळे ग्रामस्थांनी नळाद्वारे मुबलक पाणी मिळेल, असे स्वप्न पाहिले. मात्र ग्रामस्थांना पाणी मिळतच नाही. त्यामुळे ग्रामस्थांचे नळाद्वारे पाणी मिळण्याचे स्वप्न हे स्वप्नंच राहिले. महिलांसह आबालवृद्धांना उन्हातान्हात डोंगर माथ्यावरून पायपीट करीत सुमारे दोन किलोमीटरवरून पाणी आणावे लागत आहे.
गावासाठी मंजूर करण्यात आलेल्या सोलर नळ पाणीपुरवठा योजनेसाठी लाखो रुपये खर्च करण्यात आले. त्या अंतर्गत प्लास्टिक व सिमेंटच्या टाक्या बनवून ग्रामस्थांना नळाद्वारे पाण्याची सोय करण्यात आली. मात्र चार किलोमीटर अंतरावर असणाऱ्या प्लास्टिकच्या टाक्यापर्यंत पाणी पोहोचण्यासाठी तब्बल चार दिवस लागतात. त्यानंतर पुढे ३०० मीटर अंतरावर असलेल्या सिमेंटच्या टाकीपर्यंत तर पाणीच पोहोचत नाही. त्यामुळे गावातील नळांना अद्यापपर्यंत पाण्याचा थेंबही पोहोचला नसल्याने योजना पूर्ण होऊनही ग्रामस्थ तहानलेलेच आहेत. पाण्यासाठी येथील महिला व लहान मुलांना तीव्र उन्हाच्या झळा सोसत डोंगराळ भागातील खडतर पायवाटेने सुमारे दोन किलोमीटर अंतरावर पायपीट करीत पाणी आणावे लागत आहे.
गावाला नळाद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी आंबावावी पाड्यात विहीर खोदली आहे. या विहिरीवरून प्लास्टिक सिमेंटच्या टाकीत पाणी टाकण्यासाठी केलेल्या पाइपलाइनचे पाइप ठिकठिकाणी फुटल्याने पाइपात येणारे निम्म्यापेक्षा जास्त पाणी वाया जाते. त्यामुळे दोन किमीवरील पाच पाच हजार लिटर क्षमतेच्या दोन पाण्याच्या टाक्या भरण्यासाठी तब्बल चार दिवस लागतात तर तेथून पुढे तीनशे मीटर अंतरावर असलेल्या सिमेंटच्या टाकीपर्यंत पाणी पोहोचतच नाही, परिणामी नळांपर्यंत पाण्याचा थेंब ही पोहोचलेला नाही.
हातपंपही आहेत बंद
डेब्रामाळच्या पाटीलपाडा येथे ५ हातपंप आहेत. त्यातील तीन हातपंप हे आठही महिने बंद असतात. तर २ हातपंपातील पाइप बाहेर काढून पडले आहेत. त्यामुळे हे दोन्ही हातपंपदेखील गेल्या दोन महिन्यापासून बंद अवस्थेत आहेत. त्यामुळे ग्रामस्थांना आंबावावी पाड्यातील विहिरीतून पाणी आणून तहान भागवावी लागते.
दोन किलोमीटरच्या अवघड पायवाटेने आणतात पाणी
गावातील ग्रामस्थांना पाण्याची तहान भागवण्यासाठी डोंगर माथ्यावरील सुमारे दोन किलो मीटरच्या अवघड पायवाटेने पायपीट करून पाणी आणावे लागत आहे. ही समस्या दूर करण्यासाठी संबंधित विभागाने पाणीपुरवठा योजनेतील त्रुटी दूर करून ग्रामस्थांना नळाद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी उपाययोजना करून नागरिकांचे हाल थांबावेत, अशी मागणी होत आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.