आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टंचाईवर मात:नंदुरबारजवळील 19 गावांच्या पाणीपुरवठा योजनेला मुहूर्त; 18 महिन्यांनी घरात पाणी

रणजित राजपूत | नंदुरबारएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शहरानजीक असलेल्या दुधाळे, पातोंडा, वाघोदा तसेच भागसरीसह ९ गावे व उमर्देसह ७ गावांना हरघर जल योजनेचे काम १७ डिसेंबर रोजी सुरू होणार आहे. त्यामुळे नंदुरबार तालुक्यातील १९ गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न १८ महिन्यांच्या आता सुटू शकणार आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाने पाणीपुरवठ्याचा आराखडा तयार केला होता.

गत महिन्यात २४ नोव्हेंबर रोजी पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते ई पाणी पुरवठा सोहळ्यात उद्घाटन झाले. आता पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्या अध्यक्षतेखाली तसेच जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डाॅ. सुप्रिया गावित व खासदार डॉ. हीना गावित यांच्या प्रमुख उपस्थितीत लवकरच या कामांचा शुभारंभ होण्याची शक्यता आहे.

अठरा महिन्यात काम करण्याची अट घालण्यात आली आहे. भागसरी, बामदोड, धामदोद, कलमाडी, भालेर, शिंदगव्हाण, खोंडामळी, विखरण तसेच जून मोहिदे या गावांतील २०२३ या सालातील १६ हजार १४४ लोकसंख्या गृहीत धरून व २०५३ साली २२ हजार ४१३ ही लोकसंख्या गृहीत धरून पाणीपुरवठा योजनेचा आरखडा तयार केला आहे. टेंडर प्रक्रिया पूर्ण झाल्याने १७ डिसेंबरपासून कामाला सुरुवात होईल.

काम पूर्ण करण्याचे स्वीकारले आव्हान
शासन नियम व अटी,शर्तीच्या अधीन राहून हे काम १८ महिन्यांत पूर्ण करणे बंधनकारक आहे. हे आमच्यासाठी आव्हान आहे. चांगले काम करण्याची जबाबदारी स्वीकारली आहे, असे सुहास जाधव यांनी सांगितले.

प्रतिमाणसी प्रतिदिवस ५५ लिटर शुद्ध पाणी मिळणार
उमर्दे, वेळावद, लायेबिंग, पिपळोद, उमरगांव, कोठळी खु., धानोरा या गावांची २०२३ या वर्षी एकूण संख्या २२ हजार १७० एवढी गृहीत धरून तसेच २०५३ या वर्षी या गावांची लाेकसंख्या ३३ हजार १३० पर्यंत पोहोचलेली असेल. प्रति माणसी प्रतिदिवस ५५ लिटर शुद्ध पाणी मिळेल.

गावातील मालमत्तेच्या किमतीत होणार वाढ
दुधाळे, पातोंडा व वाघोदा ही गावे तर शहराच्या शेजारीच असल्याने ही तिन्ही गावे नंदुरबार शहराचा अंग बनली आहेत. या गावांत शहरातील नोकरदार वर्ग मोठ्या संख्येने राहतो. २०२३ मध्ये या तीन गावांना पाणी मिळेल, अशी आशा आहे. या भागात पाण्याची टंचाई असल्याने अनेकांनी आपल्या मालकीची घरे स्वस्त दराने घरे विकली. आता पुन्हा या गावांना चांगला दर मिळू शकेल, असेही सांगण्यात येत आहे.

बातम्या आणखी आहेत...