आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोनाचे दुष्टचक्र:मृत्यूनंतर तीन दिवस उपचार; रुग्णालयाने लाटले 90,000 रुपये

नांदेड4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
रुग्णालयाकडून देण्यात अालेले मृत्यू प्रमाणपत्र. - Divya Marathi
रुग्णालयाकडून देण्यात अालेले मृत्यू प्रमाणपत्र.
  • नांदेडमध्ये वैद्यकीय क्षेत्राला काळिमा फासणारी घटना उघडकीस
  • काेर्टाच्या आदेशानंतर डॉक्टर व कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल

कोरोना रुग्ण असलेल्या एका शिक्षकाच्या मृत्यूनंतर केवळ पैसे लाटण्यासाठी तीन दिवस त्यांच्या मृत्यूची बातमीच नातेवाइकांपासून लपवून ठेवली आणि उपचार सुरू असल्याचा अाभास निर्माण करण्यात आला. या काळात नातेवाइकांनीही धावपळ करत सुमारे ९० हजार रुपये भरले. या शिक्षकाची मृत्यूने कोराेनातून कायम सुटका केलीच होती, पैसे भरल्यावर मृतदेहाचीही रुग्णालयातून सुटका झाली. नांदेडमध्ये वैद्यकीय क्षेत्राला काळिमा फासणारा हा प्रकार उघडकीस आला असून डॉक्टरांनी मृत्यूच तीन दिवस लपवून ठेवल्याचा आरोप नातेवाइकांनी केला आहे. इतकेच नव्हे, तर मृत्यूनंतरही त्यांच्यावर उपचार सुरू असल्याचे दाखवत रुग्णालयाने पैसे उकळल्याचे नातेवाइकांचे म्हणणे आहे.

या उपचारांसाठीचा ३ दिवसांच्या खर्चाची रक्कम नातेवाइकांनी भरताच अवघ्या तासाभरात रुग्णाचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले, असे नातेवाइकांनी सांगितले.

पोलिसांत फिर्याद
धनेगाव येथील रहिवासी शुभांगी अंकलेश पवार (३४) यांनी शिवाजीनगर पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांचे पती शिक्षक अंकलेश पवार यांना ताप-खोकला असल्यामुळे १६ एप्रिल रोजी नांदेड येथील गोदावरी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या वेळी त्यांचा सीटी स्कॅन स्कोअर ७, तर ऑक्सिजन लेव्हल ९८ वर होती. या वेळी शुभांगी यांनी रुग्णालयात ५० हजार रुपये डिपॉझिटही भरले. यानंतर अंकलेश यांची प्रकृती खालावत गेली. २० एप्रिलला डॉक्टरांनी कोणतीही सूचना न देता अंकलेश यांना आयसीयूमध्ये शिफ्ट केले. २१ एप्रिलला डॉक्टरांनी नातेवाइकांना टॉसिलिझुमॅब हे ३५ हजार रुपये किमतीचे इंजेक्शन आणण्यासाठी सांगितले व त्याच दिवशी हॉस्पिटलमध्ये पैसे भरण्यास सांगितले. या वेळी रुग्णालयाकडे पैसे भरण्यासाठी मुदत मागितली असता त्यांनी ती दिली नाही. विनंतीनंतर डॉक्टरांनी २४ एप्रिलपर्यंत पैसे भरण्यास सांगितले. २४ रोजी ऑनलाइन ५० हजार रुपये व राेख ४० हजार रुपये असे एकूण ९० हजार रुपये सकाळी १० ते ११ वाजेच्या दरम्यान भरले. यानंतर अंकलेश यांचे निधन झाल्याचे बारा वाजता डॉक्टरांनी कळवल्याची माहिती शुभांगी यांनी दिली. या वेळी मृतदेह व मृत्यू प्रमाणपत्राची मागणी केली असता रुग्णालयाने अंकलेश यांचा मृतदेह व त्यांचे तात्पुरत्या स्वरूपात मृत्यू प्रमाणपत्र दिले.

१ लाख ४० हजार रुपये भरले
अंकलेश यांच्या उपचारासाठी आम्ही रुग्णालयाकडे एक लाख ४० हजार रुपये भरले होते. आम्हाला दिलेल्या मृत्यू प्रमाणपत्राची ताईने पडताळणी केली. यानंतर अंकलेश यांचा मृत्यू २१ एप्रिललाच झाल्याचे समोर आले. यानंतर आम्ही अ‍ॅड. शिवराज पाटील यांच्या माध्यमातून जिल्हा न्यायालयात याचिका दाखल केली. न्यायालयाने तत्काळ शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे आदेश काढले. -नितीन राठोड, मृताचे मेहुणे.

असे समोर आले वास्तव

या शिक्षकाच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार झाल्यानंतर मृत शिक्षकाच्या पत्नीने रुग्णालयातील कागदपत्रांची पडताळणी केली तेव्हा ही बाब उघड झाली. तिने न्यायालयात धाव घेतल्यानंतर न्यायालयाने नांदेड येथील गोदावरी रुग्णालयातील डॉक्टर व कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानुसार, मंगळवारी पोलिसांनी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात कलम ४२०, ४१८, ४६७,४६८, ४७१, ४१७, ४३७ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

कागदपत्रे तपासल्यावर धक्कादायक माहिती उघड
२५ एप्रिलला अंकलेश यांच्यावरील उपचारांची कागदपत्रे पाहिल्यावर त्यांचा मृत्यू २१ एप्रिल रोजी रात्री ११ वाजता झाल्याचे समोर आले. परंतु, गोदावरी हॉस्पिटलने २४ एप्रिल रोजीपर्यंत मेडिकल व औषधोपचाराचा खर्च घेतला, असे शुभांगी यांचे म्हणणे आहे. केवळ पैसे देणे बाकी होते म्हणून डॉक्टरांनी २४ रोजी मृतदेह दिला. २६ रोजी डॉक्टरांना मूळ कागदपत्रे व मृत्यूचे प्रमाणपत्र देण्याची मागणी केली तेव्हा त्यांनी सुरुवातीला टाळाटाळ करत ४० हजार रुपये भरण्यास सांगितले. तोपर्यंत कागदपत्रे मिळणार नाहीत, असे रुग्णालयाने सांगितल्याचे शुभांगी यांनी फिर्यादीत म्हटले आहे.

डॉक्टरांशी संपर्क नाही
रात्री ७.३९ वाजता गोदावरी हाॅस्पिटल येथे डॉक्टरांची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला. मात्र ते जिल्हाधिकाऱ्यांना भेटण्यासाठी गेले असल्याचे सांगण्यात आले. त्यांचा संपर्क क्रमांक मागितला, पण कुणी दिला नाही. त्यामुळे त्यांची प्रतिक्रिया यात मिळू शकली नाही.

जिल्हाधिकाऱ्यांकडून दखल
जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांनी दिलेल्या सूचनेनुसार गोदावरी हॉस्पिटल प्रकरणाची चौकशी करून लेखाधिकारी नीळकंठ पासंगे यांना अहवाल देण्यास सांगितले आहे, असे अपर जिल्हाधिकारी के. आर. परदेशी यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना सांगितले.

दिव्य मराठीची भूमिका- थांबवा हा ‘बाजार’
कोरोना काळात घरदार विसरून डॉक्टर्स आणि वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचारी जिवावर उदार होत अखंड रुग्णसेवा करत आहेत. यात अनेक डॉक्टरांना आपला जीवही गमवावा लागला. यानंतरही डॉक्टरांनी माघार घेतलेली नाही. त्यांनी सेवेची समई तेवत ठेवली आहे. अशा कोरोना योद्धे डॉक्टरांबद्दल आदर आम्हाला आहेच. मात्र, काही जणांनी कोरोनाचा थेट बाजार मांडला आहे. ‘मृताच्या टाळूवरचे लोणी खाणारे’ हे डॉक्टर केवळ डॉक्टरी पेशालाच बदनाम करत आहेत असे नाही, तर त्यांनी माणुसकीच सोडली की काय, असा प्रश्न नांदेडमधील ही घटना पाहिल्यानंतर पडतो. या घटनेचा आम्ही निषेध करतो. अशा काही डॉक्टरांमुळे इतरांच्या देवत्वाला मात्र इजा पोहोचू नये. म्हणून इतकेच सांगणे आहे, हा ‘बाजार’ थांबवा. त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे, संबंधित यंत्रणा एवढ्या संवेदनशून्य कशा झाल्या आहेत? अशा बाजाराला रोखण्याची हिंमत त्यांच्यात नाही की त्याही या बाजाराला शरण गेल्या आहेत? “दिव्य मराठी’ आता या बाजाराचा भंडाफोड केल्याशिवाय गप्प बसणार नाही.- संपादक

बातम्या आणखी आहेत...