आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनास्था:दानियल कोतवालची नव्हे, ही आहे निष्क्रिय प्रशासनाचीच अंत्ययात्रा, नदीपलीकडच्या दफनभूमीत जाण्यासाठी ग्रामस्थांना गळ्याइतक्या पाण्यातून न्यावी लागते अंत्ययात्रा

नवापूर, जि.नंदुरबार ( नीलेश पाटील)14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
तरुणाच्या अंत्यविधीसाठी धनराट गावालगत पूर आलेल्या रंगावली नदीतून मार्ग काढताना ग्रामस्थ. - Divya Marathi
तरुणाच्या अंत्यविधीसाठी धनराट गावालगत पूर आलेल्या रंगावली नदीतून मार्ग काढताना ग्रामस्थ.
  • स्मशानभूमीसाठी पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी, ग्रामस्थांची मागणी

नवापूर तालुक्यातील धनराट गावालगत दफनभूमी नसल्याने आदिवासी बांधवांना ४ फूट खोल नदीच्या पाण्यातून मार्ग काढत पलीकडे जाऊन अंत्यविधी करावे लागतात. दानियल सतू गावित या २३ वर्षांच्या तरुणाचा आजाराने मृत्यू झाल्यानंतर आदिवासी बांधवांनी शुक्रवारी पूर आलेल्या रंगावली नदीतून अंत्यविधीसाठी मार्ग काढला. पुरातून कुणी वाहून जाऊ नये यासाठी शेतातील एका झाडाला दोर बांधला व त्याचा आधार घेत पाण्यातून वाट काढली गेली. जिवंतपणी उपेक्षितांचे जीवन जगणाऱ्या आदिवासींच्या मृत्यूनंतरही यातना त्यांचा पिच्छा सोडत नाहीत. त्यामुळे ही दानियल सतू कोतवालची नव्हे तर निष्क्रिय प्रशासनाची अंत्ययात्रा आहे, असे म्हणायची वेळ आली आहे.

नंदुरबार जिल्ह्यातील नवापूरपासून १० किमी अंतरावर ४१५ लोकसंख्या असलेले धनराट हे गाव आहे. त्यात कोतवाल फळीत ३५ आदिवासींची घरे आहेत. गावकऱ्याच्या मृत्यूनंतर अंत्यविधीसाठी गावानजीक साधी दफनभूमीही नाही. अन्य सोयी-सुविधांची चर्चाही नको. दानियल या तरुणाचा गुजरात राज्यातील व्यारा येथे आजाराने मृत्यू झाला. त्याचा मृतदेह गावी आणण्यात आला. गावानजीक दफनभूमी नसल्याने रंगावली नदीतूनच मार्गक्रमण करीत ग्रामस्थांनी अंत्ययात्रा काढली. केंद्र व राज्य शासनाच्या ढिगभर योजनांसाठी कोट्यवधी रुपये खर्च केले जातात; मात्र आदिवासी वस्त्यांमध्ये असलेली ही दुरवस्था संताप आणणारी आहे.

स्मशानभूमीचे बांधकाम करू
स्मशानभूमीसाठी पर्यायी जागा उपलब्ध नाही. जागा उपलब्ध झाल्यास ग्रामपंचायत ठराव मंजूर करून स्मशानभूमीचे बांधकाम करण्यात येईल. दिनकर भान्या गावित, सरपंच, धनराट

स्मशानभूमीसाठी पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी
गावातील कुणाचा मृत्यू झाल्यास वर्षानुवर्षे अंत्यविधीसाठी नदी पार करून जावे लागते. पावसाळ्यात प्रचंड हाल होतात. रस्त्याने गेलो तर ४ किलोमीटरचा फेरा पडतो. त्यामुळे कोतवाल फळीतील ग्रामस्थ नदी पार करूनच अंत्यविधी करतात. लवकरात लवकर पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी. प्रशासन व लोकप्रतिनिधी आमच्या सामूहिक मृत्यूची वाट पाहत आहेत काय? - सुंदर कोतवाल, ग्रामस्थ, धनराट.

बातम्या आणखी आहेत...