आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातान्हुल्या बाळासह आईला रेल्वे प्रवासात निर्धास्त झोप घेता यावी यासाठी श्रॉफ हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालयाचे शिक्षक नितीन देवरे आणि त्यांच्या पत्नी हर्षाली देवरे या दांपत्याने संशोधन करून तयार केलेल्या “फोल्डेबल बेबी बर्थ’ या प्रोजेक्टला पेटंट मिळाले आहे. शिवाय समाजाचा एक घटक म्हणून आम्ही हे संशोधन भारतीय रेल्वेला विनामूल्य हस्तांतरित करण्याची तयारीदेखील संशोधकांनी दर्शवली आहे.
रेल्वेतील डब्यात आई व बाळ अशा दोघांना झोपण्यासाठी स्वतंत्र जागा उपलब्ध होत नाही. त्यामुळे त्यांना रात्रभर छोट्याशा जागेत अडखळत झोपावे लागते. त्यावर “फोल्डेबल बेबी बर्थ’ हा उपाय ठरू शकतो. श्रॉफ हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे नितीन देवरे व त्यांच्या पत्नी हर्षाली देवरे यांनी यासंबंधीचे पेटंट फाईल केले.
बाळाच्या सुरक्षेसाठी संरक्षक बेल्टची सुविधा : ‘फोल्डेबल बेबी बर्थ’ हा ७६ सेमी बाय २३ सेमी अाकाराचा बर्थ आहे. जो १०-१२ किलो वजन पेलू शकतो. यामध्ये बाळ झोपेत खाली पडू नये म्हणून संरक्षक बेल्ट अथवा सीट बेल्टची रचना केली आहे. त्याचा कोचमधील इतर प्रवाशांना कुठलाच त्रास होणार नाही.
संशोधक नितीन देवरे व हर्षाली देवरे यांचे हे पेटंट २६ नोव्हेंबर २०२१ रोजी इंडियन पेटंट जर्नलच्या आवृत्तीत प्रकाशित झाले आहे. या प्रोजेक्टमध्ये कंपोझिट लॉकिंग यंत्रणा वापरली आहे. कंपोझिट लॉकिंग यंत्रणा रेल्वे ऑटोमोबाइल तसेच फोल्डेबल फर्निचरमध्ये देखील वापरता येते.
पत्नीला आलेल्या अडचणीतून सुचली कल्पना
रेल्वेतील लोअर बर्थचा विचार करूनच हा बर्थ तयार केलेला आहे. समाजाचा एक घटक म्हणून आम्ही हे संशोधन भारतीय रेल्वेला विनामूल्य हस्तांतरित करण्यास तयार आहोत. माझ्या पत्नीने ही अडचण सांगितली. यातूनच ‘फोल्डेबल बेबी बर्थ’ या उपकरणाची कल्पना सुचली. -नितीन देवरे, संशोधक,नंदुरबार
गरज नसल्यास सहजपणे फोल्डही करता येईल
सध्या अस्तित्वात असलेल्या लोअर बर्थला जर हा “फोल्डेबल बेबी बर्थ’ जोडला तर बाळ हे या बर्थवर झोपू शकते. अर्थातच लोअर बर्थ हा आईला झोपण्यासाठी पूर्णपणे मोकळा असेल. गरज नसल्यास बेबी बर्थ, लोअर बर्थ खाली फोल्ड करता येतो. ज्यामुळे बसून प्रवास करण्याच्या स्थितीत हा बर्थ अडथळा ठरत नाही. या बर्थचा वापर प्रौढ व्यक्तींना मेडिसिन किंवा इतर वस्तू ठेवण्यासाठीदेखील होऊ शकतो.
बाळ-आईच्या आरोग्यासाठी महत्त्वाचे
बाळ व आई या दोघांच्या आरोग्याच्या दृष्टीने फोल्डेबल बेबी बर्थ महत्त्वाचा ठरेल. बाळासोबत असलेल्या महिलांचा विचार करता एका बोगीमध्ये किमान एक फोल्डेबल बेबी बर्थ असावा. -हर्षाली देवरे, संशोधक,नंदुरबार.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.