आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वीज बिलांची प्रतीक्षा:ठेकेदार बदलताच नव्या कर्मचाऱ्यांना घर सापडेना; विजेची बिले वाटपाचा गोंधळ

नंदुरबार3 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ७ हजार २०० वीज ग्राहकांचा प्रश्न; तक्रारींमध्ये वाढ

शहरातील घरगुती विजेचे बिल वाटप करणाऱ्या एका कंपनीने निविदा न भरल्याने आणि दुसऱ्याच कंपनीची निविदा मंजूर झाल्याने वीज बिल वाटप करताना नव्या कंपनीच्या कर्मचाऱ्यांना पत्ते शोधताना अडचणी येत आहेत. त्यामुळे अनेक भागात वीज बिल पोहाेचलेले नाही. ७ हजार २०० जणांना बिल वाटपाची जबाबदारी धनश्री कंपनीची असून १ जूनपासून ठेकेदार बदलल्याने अनेक जणांना बिले मिळाली नसल्याच्या तक्रारी आहेत. ही समस्या तात्पुरती असून लवकरच वीज बिल वाटपाची प्रक्रिया सुरळीत होईल, असा दावा वीज महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी केला आहे.

नंदुरबार शहरात ३३ हजार ८९९ वीज ग्राहक आहेत. त्यात २७ हजार ६८८ घरगुती ग्राहक असून ४ हजार ८९० ग्राहक वाणिज्य वापराचे आहेत. केवळ २१० ग्राहक हे औद्योगिक असून १११ पथदिव्या (स्ट्रीट लाइट)साठी वीज दिली जाते. तर ७२ पाणीपुरवठा करणाऱ्या पंपांना वीजपुरवठा केला जातो.

ग्राहकांची घरे शोधून वेळेवर बिल पोहोचवण्याचे आव्हान
१ जूनपासून नव्या ठेकेदाराकडे वीज बिल वाटपाची जबाबदारी आली. तेव्हापासून वीज बिल वाटपाच्या तक्रारी वाढत गेल्या. नव्या ठेकेदाराकडे ७ हजार २०० वीज ग्राहकांना बिल वाटपाची जबाबदारी आहे. पूर्वीच्या ठेकेदारापेक्षा कमी किमतीची निविदा भरल्याने नव्या निविदेला मंजुरी मिळाली. मात्र बिल वाटपाची जबाबदारी असली तर ग्राहकांची घरे शोधणे व त्यांना वेळेत बिल पोहोचवणे, ही नवी आव्हाने त्याच्यापुढे उभी ठाकली आहेत.

लवकरच वीज बिल वेळेवर देण्याची प्रक्रिया सुरळीत
नव्या ठेकेदाराने कमी किमतीची निविदा भरल्याने निविदा मंजूर झाली. वीज बिल भरताना अधिक समस्या येणार नाही. आता अनेक जणांना मोबाइलवरून संदेश दिला जातो. त्यामुळे वीज बिल किती आले, ते एसएमएसमुळे समजते. ठेकेदार नवीन असल्याने थोडा फार त्रास होईल. पण लवकरच बिलांची प्रक्रिया सुरळीत होईल.
- मनीषा कोठारी, अभियंता, वीज महावितरण कंपनी, नंदुरबार.

उशिरा बिल मिळाल्याने १०,२० रुपयांचा बसताे नाहक भुर्दंड
शहराची वीज बिल वसुली जोरात सुरू असून ३ कोटीहून अधिक थकबाकी वसुलीचे आव्हान आहे. वीज बिल आले नाही तर अनेक जण बिले भरत नाहीत. त्यामुळे वीज बिल त्यांना लवकर कसे पोहचतील त्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. दोन महिन्यांपासून वीज बिल वेळेवर मिळत नाही. परिणामी उशिरा बिल भरावे लागते. त्यामुळे १० ते २० रुपयांचा भुर्दंड सोसावा लागतो.
- योगेश चौधरी, व्यापारी, नंदुरबार.

बातम्या आणखी आहेत...