आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजुनी पेन्शन लागू करा, या मागणीसाठी जिल्ह्यातील ५७ संघटनांनी संपात सहभाग घेतला असून, जवळपास ८ हजार ५०० कर्मचारी संपात उतरले आहेत. आरोग्य, महसूल, कोषागार, जिल्हा पाेलिस अधीक्षक कार्यालयीन कर्मचारी, जि.प.चे प्राथमिक, माध्यमिक शिक्षक, अनुदानित खासगी शाळेचे शिक्षक संपात सहभागी झाले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच विभागांची कामे ठप्प झाली आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सकाळी कर्मचाऱ्यांची गर्दी होती. त्यानंतर ही गर्दी दुपारनंतर कमी झाली. कर्मचाऱ्यांच्या संपाचा सर्वसामान्यांवर बिकट परिणाम झाला. आरोग्य यंत्रणा ठप्प झाल्याने जिल्ह्यातील ६ हजाराहून अधिक रुग्ण उपचारांपासून वंचित राहिली असावीत, असा अंदाज व्यक्त होत आहे. सीआयटीयू प्रणीत आदिवासी विकास प्रकल्प संघटनेचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, राज्य सरकारी चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनेचे ५५० कर्मचारी, शासकीय, निमशासकीय लिपिक हक्क परिषदेचे कर्मचारी सहभागी झाले.
मुलाबाळांसह आंदोलनात सहभाग
संपात कुटुंबीयांनी आपल्या लेकराबाळांसह आंदोलनात सहभाग नोंदवला. त्यांच्या हातात भावनिक संदेश देणारे फलक देण्यात आल्याने आंदोलनकर्त्यांत चिमुरडी मुले लक्ष वेधून घेत होती.
मागणी मान्य होईपर्यंत संप सुरूच
राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेला ५७ संघटनांचे समन्वयक जोडले आहेत. मागणी मान्य होईपर्यंत संप सुरूच राहणार आहे.- हेमंत देवकर, अध्यक्ष: राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना
पेन्शनरांचा पगार, इतर देयकांची कामे रखडली
तर महसूल, आरोग्य, कोषागार, आदिवासी विकास प्रकल्प, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयीन कर्मचारी, लिपिक या सर्व कर्मचाऱ्यांची संख्या जवळपास ८ हजार ५०० एवढी असून कोषागार कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांनी मार्च महिन्यात संप पुकारल्याने पेन्शनरांचा पगार, इतर देयकांची कामे रखडली आहेत. महसूल कर्मचाऱ्यांच्या संपामुळे उत्पन्नांचे दाखले, जातीचे दाखलेही काम ठप्प झाल्याने सर्व सामान्यांचे हाल झाले.
आपत्कालीन सेवा सुरू
जिल्ह्यात ६१ प्राथमिक आरोग्य केंद्रे, २९० उपकेंद्रे, महसूल १, नागरिक आरोग्य केंद्र ३, पुनर्वसन दवाखाने १०,आरोग्य पथक ८,आयुर्वेदिक दवाखाने ८ यातील सर्व कर्मचारी सहभागी झाले. तर आपत्कालीन सेवा सुरू ठेवण्याचा आरोग्य कर्मचाऱ्यांनी निर्णय घेतला आहे. जिल्ह्यातील १७०० आरोग्य कर्मचारी सहभागी झाले आहेत, अशी माहिती जि.प. आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष अभयसिंग चित्ते यांनी या वेळी दिली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.