आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सदोष मार्ग:दीड कोटींचा भुयारी मार्ग झाला जलमार्ग; जुन्याच एकेरी मार्गावरून वाहतूक सुरू, नागरिकांचे होणार हाल

नंदुरबार11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नळवारोडवर सुमारे दीड कोटी रूपये खर्च करून तयार झालेल्या भुयारी रस्त्यात पहिल्याच पावसात पाणी साचल्याने या मार्गावरून वाहतूक सेवा बंद आहे. जुन्याच एकेरी मार्गावरून वाहतूक सुरू असून पाणी साचून राहिल्यास हा भुयारी मार्ग पावसाळयात काहीच कामात येणार नसल्याने पाणी वाहून नेण्यासाठी सुविधा आवश्यक असल्याचे मत व्यक्त करण्यात येत आहे. उपाययोजना न केल्यास रस्ता निरूपयोगी ठरणार आहे.

शहरातील नळवा रोडवरील रेल्वे बोगद्याचे दुहेरीकरणाचे काम दोन महिन्यापासून सुरू असून पालिकेच्या हिस्स्याची रक्कम आधीच राज्यशासनाने रेल्वे प्रशासनाकडे सुपुर्द केली होती. तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कारकीर्दीत १ कोटी व नंतर ५० लाख देखील या कामासाठी दिले होते. पावसाळयापूर्वी बोगदा पूर्ण होणे अपेक्षित होता. परंतु अजूनही बोगदा सुरू केलेला नाही.

दोनच महिन्यांपूर्वी काम सुरू
लॉकडाऊन काळात गत मे महिन्यात रस्ता दुरूस्तीचे काम करण्यात आले होते. त्यानंतर दोन महिन्यापूर्वी बोगद्याच्या कामास प्रारंभ झाला. अनेक वेळा हा रस्ता जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने वाहतुकीसाठी बंद केला होता. आता एकेरी मार्ग सुरू आहे. तसेच काही दिवसापूर्वी दुसरा मार्गही अंतिम टप्प्यात आला होता. किरकोळ काम शिल्लक असतानाच नागरिकांनी हा मार्ग वापरण्यासाठी सुरू केला होता. पावसाळा सुरूच होताच या भुयारी मार्गात पाणी साचत आहे. आता हे पाणी काढण्यासाठी रेल्वे प्रशासन काय मदत करणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

बोगद्याजवळ गटार होणे गरजेचे
बोगदा बनवताना पावसाळयातील पाणी साचू शकते, या शक्यतेचा विचारच केलेला दिसून येत नाही. त्यामुळे मोठा गाजावाजा करून तयार करण्यात येत असलेला व अंतिम टप्प्यातील बोगदा तांत्रिक दृष्टया सदोष वाटत आहे. त्यामुळे बोगद्याजवळ पाणी वाहून नेणारी गटार होणे गरजेचे आहे.

पावसाळ्यात समस्या राहील कायम
रेल्वे भुयारी रस्त्यात गटारीची क्षमता कमी आहे. या भागात बाहेरपुरा हौसिंग सोसायटी सह परिसरातील पाणी साचते. या भागात तयार केलेला भुयारी रस्ता पावसाळयात शक्यतो कामात येणार नाही. रेल्वे विभागाने काहीही केले तरी समस्या कायम राहील. अडगळीची व कमी जागा यामुळे पाणी दुसरीकडे जाईलही. पण पावसाळयातील पाणी वळवण्यासाठी इथे दुसरा पर्याय नाही, अशी माहिती ज्येष्ठ अभियंता संजय देसले यांनी दिव्य मराठीशी बाेलताना दिली.

नगरपालिका शोधेल पर्यायी मार्ग
नळवा रस्त्यावरील भुयारी मार्ग अजून सुरू करण्यात आलेले नाही. रस्त्यात पाणी साचत असेल तर पालिकेकडून पर्याय शोधण्यात येईल. हाईट गेज टाकण्याचे काम शिल्लक आहे. ते लवकरच पूर्ण करण्यात येणार आहे.
राजेश टंडन, असिस्टंट इंजिनिअर, पश्चिम रेल्वे,नंदुरबार

बातम्या आणखी आहेत...