आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रतिपादन:विद्यार्थ्यांच्या गुणांना वाव मिळण्यासाठी या वर्षापासून स्पर्धांचे आयाेजन : अॅड. वळवी

नंदुरबारएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हा परिषदेच्या शाळांकडे पालकांचा कल असावा यासाठी प्रत्येक शिक्षकाने शाळेच्या गुणवत्तेकडे लक्ष दिले पाहिजे. शिक्षणाचा टक्का वाढवण्यासाठी शिक्षकांनी प्रयत्न करावेत. आदिवासी विद्यार्थ्यांना प्रॅक्टिकली ज्ञान दिल्यास तेही शहरी शाळांच्या विद्यार्थ्यांशी स्पर्धा करू शकतील, असे मत व्यक्त करत विद्यार्थ्यांच्या क्रीडा गुणांना वाव मिळावा, यासाठी यंदापासून क्रीडा स्पर्धा भरवण्यात येतील, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अॅड.सीमा वळवी यांनी केले.

जिल्हा परिषदेच्या सभागृहात साेमवारी ५ सप्टेंबर या शिक्षक दिनानिमित्त आयोजित आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळ्यात त्या बोलत होत्या. यावेळी समाज कल्याण सभापती रतन पाडवी, कृषी व पशुसंवर्धन सभापती गणेश पराडके, महिला व बालकल्याण सभापती निर्मला राऊत, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, नवापूर पंचायत समितीचे सभापती रतीलाल कोकणी, शिक्षणाधिकारी डॉ.माधव कदम, शिक्षणाधिकारी सतीश चौधरी, उपशिक्षणाधिकारी बी.आर. राेकडे आदी मान्यवर उपस्थित होते.

८० टक्के शाळा चांगल्या, उर्वरित शाळा गुणवत्ता सुधारणार
सीआे गावडे म्हणाले, दुर्गम भागात अनेक समस्या आहेत. खूप शिक्षक चांगले काम करत आहेत. परंतु हे चित्र राज्य शासनापर्यंत पोहाेचवण्यासाठी काही उदाहरण त्यांच्यापुढे मांडू. जिल्ह्यात ८० टक्के शाळा चांगल्या आहेत. २० टक्के शाळांनी गुणवत्ता सुधारण्याचे वचन दिले आहे. त्यामुळे जिल्ह्यात सकारात्मक चित्र निर्माण होईल, अशी आशा करू या असे ते म्हणाले.

आदर्श पुरस्काराचे मानकरी ठरले जिल्ह्यातील हे शिक्षक
अक्कलकुवा तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा, उदयपूर खालचे शिक्षक मोगीलाल खंडू चौधरी, नंदुरबार तालुक्यातील वरुळ जि.प. शाळेचे शिक्षक दयानंद विश्वंभरराव जाधव, नवापूर तालुक्यातील जि.प. शाळा बर्डीपाडा नंदनवन येथील शिक्षिका सुरेखा शेखजी गावित, शहादा तालुक्यातील जि.प. शाळा देऊळ येथील शिक्षक राजाराम दशरथ पाटील, तळोदा तालुक्यातील जि.प. शाळा ताराबाद येथील शिक्षिका शीतल किशोर शिंदे, धडगाव तालुक्यातील जि.प. शाळा काल्लेखेतपाडा येथील शिक्षक लक्ष्मीपुत्र वीरभद्रप्पा उप्पिन, प्रोत्साहनपर पुरस्कारासाठी अक्कलकुवा येथील जि.प. उर्दू शाळा क्रमांक दोनच्या शिक्षिका सुमय्या मोहम्मद इस्माईल व धडगाव तालुक्यातील जि.प. शाळा माथा असली येथील शिक्षक धीरसिंग शिवण्या वसावे हे आदर्श शिक्षक पुरस्काराचे मानकरी होते.

शिक्षण क्षेत्रात काम करण्याची संधी हे भाग्यच
शिक्षण क्षेत्रात काम करायला मिळणे हे खरोखरच भाग्याची बाब आहे. पुण्याचे काम आपल्याला करायला मिळत आहे. विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत आपला वाटा असतो. यासारखे दुसरे पुण्य नाही.
बी.आर. रोकडे, उपशिक्षणाधिकारी, नंदुरबार.

बातम्या आणखी आहेत...