आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सारंगखेडा यात्रोत्सव:चेतक फेस्टिव्हलसाठी 1 हजाराहून अधिक घोडे दाखल; बादल, महाबलीचा रुबाब

सारंगखेडा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

दत्तजयंतीपासून भरणाऱ्या सारंगखेडा यात्रेसाठी १ हजार घोडे विक्रीसाठी दाखल झाले आहेत. यात ‘महाबली’ घोडा सगळ्यांच्या चर्चेचा विषय ठरत आहे. त्याची किंमत तब्बल २१ लाख रुपये आहे.टेंभे रस्त्याला लागून सारंगखेड्याहून २ किलोमीटर अंतरावर सुमारे १६ एकर जागेत हे अश्व विश्व उभे राहात असल्याची माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव संजय चौधरी यांनी दिली. त्यासोबत २१ ते २३ डिसेंबर दरम्यान येथे होणाऱ्या चेतक फेस्टिव्हलमध्ये अनेक अश्व स्पर्धा, अश्व प्रदर्शन असे अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. त्यासाठी सज्ज होणाऱ्या या अश्व मेळाव्यातील रोषणाई अंतिम टप्यात आली आहे.

देशभरातून घोडे दाखल
महिनाभर चालणाऱ्या या यात्रेसाठी देशभरातून घोडे दाखल होत आहेत. राजस्थानसह पंजाब, गुजरातहून अल्बक्ष, काजल, बाहुबली नावाचे मारवाडी, बछड़े, काठियावाडी, नुकरा अशा अनेक प्रजातींचे घोडे पोहोचले आहेत. यात्रेच्या दिवसापर्यंत ही संख्या ३ ते साडे तीन हजारांच्या घरात जाण्याची शक्यता आहे.

अश्वांचे खाद्य, निवारा आणि पाणीतून मिळाला रोजगार
घोड्यांना खाद्य मुबलक प्रमाणात लागत असते. घोड्यांना प्रामुख्याने चारा, चणा, गहू, बाजरी, मकासह अनेक खाद्याची आवश्यकता असते. हे सगळे पुरवण्यासाठी परिसरातील नागरिकांना रोजगार मिळत असतो. खासकरून महिला शेताच्या बांधावरील चारा गोळा करून शंभर ते दोनशे रुपयाला विक्री करतात. त्यातून उदरनिर्वाह होतो. परिसरातील छोटे मोठे किराणा व्यावसायिक खाद्य पुरवतात. पाण्याची व्यवस्था बाजार समिती व चेतक महोत्सव समितीच्या माध्यमातून केली जात असते. घोड्यांना अन्न पुरवण्यासाठी अनेकांना रोजगार मिळत असतो.

२१ लाखांचा ‘देवमन कंठ’ असलेला महाबली
प्रत्येकाच्या मनातल्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी ‘महाबली’चे मालक अब्दुल खालिद त्याच्या मानेकडे उंगली दर्शन करीत होते. ‘देवमन कंठ... महाबली चे दोन्ही डोळे पांढरे आहेत आणि त्याच्या गळ्यावरचा हा देवमन कंठ याचीच ही किंमत आहे. देवमन कंठ असलेला घोडा शुभ मानला जातो. त्याची अंघोळ आणि त्याची स्वच्छता, देखभाल यासाठी त्यांनी दोन सेवक कायम स्वरुपी तैनात ठेवले आहेत. रोज दूध, गहू, बाजरी, चणे असा त्याच्या खुराक व देखभालीचा खर्च पंधराशे ते दोन हजारांच्या घरात जात असल्याचं ते सांगत होते.

११ लाखांचा बादल : बादलची उंची तब्बल ६३ इंची इतकी आहे. त्याला रोज सकाळी ५ लिटर व संध्याकाळी ५ लिटर असे दहा लिटर दूध रोज लागते. त्याच्या देखरेखीत एक व्यक्ती २४ तास उपलब्ध असतो. चणा, गहू, बाजरी सारखे खाद्य त्याला रोज लागतो. उत्तर प्रदेश बरेलीच्या मालकाने त्याची किंमत ११ लाख रुपये लावली आहे.

बातम्या आणखी आहेत...