आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी ब्रेकिग:शहरामध्ये कायमस्वरूपी अवजड वाहनांना बंदी , तर एसटी बसेस बायपासने वळवणार ; वाहतुकीची कोंडी फुटणार

रणजित राजपूत | नंदुरबारएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शाळकरी मुलांच्या सुरक्षेसाठी तसेच नागरिकांना अवजड वाहनांमुळे होणाऱ्या कोंडीतून मुक्त करण्यासाठी शहरात अवजड वाहनांसह एसटी बसला देखील आता कायमस्वरूपी बंदी घालण्यात येणार आहे. यासंदर्भात वाहतूक पोलिस विभागाकडून प्रस्ताव तयार करण्यात येत आहे. दोन दिवसांत अधिसूचना जारी होऊन रहदारीचे नवीन नियम लागू होणार आहेत. तसेच राज्य परिवहन महामंडळाच्या वरिष्ठांकडे एसटी बसच्या रहदारीचा मार्ग बदलण्याचा प्रस्तावही पाठवला जाणार आहे. यामुळे कायमस्वरूपी वाहतुकीची कोंडी दूर होणार असल्याने गणेशोत्सवात नंदुरबारकरांसाठी ही मोठी सुवार्ता ठरणार आहे.

नंदुरबार शहरात अतिक्रमणाने आधीच विळखा घातला आहे. तसेच पार्किंगची सुविधा नसल्याने रहदारीचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. शहरात तीन महिन्यापूर्वी मोठा मारूतीजवळ अपघात झाला. यानंतर रहदारीचा प्रश्न सोडवण्यात येईल, असे आश्वासन पोलिस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी दिले होते. वाहतूक पोलिस विभागाने हा प्रश्न मार्गी काढण्याचा निर्णय घेतला आहे. ‘दिव्य मराठी’ने हा विषय लावून धरला होता.

दोन दिवसांत होणार अंमलबजावणी
जिल्हा पोलिस अधीक्षक पी. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक पोलिस निरीक्षक सुनील नंदवाळकर हे प्रस्ताव तयार करीत आहेत. यातील पहिला टप्पा एसटी बायपास रस्त्यावरून वळवणे व शहरातील महत्वाच्या बाजारपेठेत चारचाकी वाहनांना बंदी घालणे या महत्वाच्या नियमांची अंमलबजावणी दोन दिवसांत होणार आहे.

शहरात या ठिकाणी लावणार बॅरिकेट्स
सकाळी ९ ते सायंकाळी ७ या वेळेत आमदार कार्यालय, शास्त्री मार्केट, गणपती मंदिर, अमृत टॉकीज या महत्वाच्या भागातील रस्त्यांवर अवजड वाहनांना बंदी घालणार आहे. शास्त्री मार्केट, स्मारक चौकाजवळ, अहिल्यादेवी विहिर, मंगलभूवन, संकटमोचन हनुमान मंदिर, अमृत चौक परिसरात बेरिकेट्स लावण्यात येणार आहेत.

अशी असेल वाहनांना बंदी
एसटी बस धुळे चौफुलीवरून धुळे रोड, मोठा मारूती, नाट्यगृहाकडून एसटी बस स्थानकात जाते. दोन दिवसांत हा मार्ग बदलण्यात येणार असून धुळे, नवापूरहून येणाऱ्या सर्व गाडया आता धुळे चौफुलीवरून जगताप वाडी ते एसटी बस स्थानक अशी वळवण्यात येणार आहे. त्यामुळे श्रॉफ हायस्कूल, स्टेट बँक व डी. आर. हायस्कूल या परिसरात विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य मिळणार आहे. दुसरा बदल असा असेल, शहरातील महत्वाच्या वर्दळीच्या ठिकाणी जड वाहनांबरोबरच चारचाकी वाहनांना बंदी घालण्यात येणार आहे. फक्त रिक्षा व दुचाकी वाहनेच या मार्गावर दिसतील. त्यामुळे वाहतुकीच्या कोंडीतून शहरवासीयांची मुक्ती मिळणार आहे.

बातम्या आणखी आहेत...